Home / महाराष्ट्र / Shriniwas Pawar : २०२९ च्या संघर्षावर भाष्य करणे अकाली”; रोहित आणि जय पवारांच्या विधानांवर श्रीनिवास पवारांची सावध पण परखड प्रतिक्रिया

Shriniwas Pawar : २०२९ च्या संघर्षावर भाष्य करणे अकाली”; रोहित आणि जय पवारांच्या विधानांवर श्रीनिवास पवारांची सावध पण परखड प्रतिक्रिया

Shriniwas Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान ‘२०२९’ च्या उमेदवारीवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना, आमदार रोहित पवार यांचे वडील आणि...

By: Team Navakal
Shriniwas Pawar
Social + WhatsApp CTA

Shriniwas Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान ‘२०२९’ च्या उमेदवारीवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना, आमदार रोहित पवार यांचे वडील आणि दिवंगत अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी यावर अत्यंत महत्त्वाची आणि संयमी भूमिका मांडली आहे. जय पवार आणि रोहित पवार या दोन्ही तरुणांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक असू शकतात, मात्र अशा संवेदनक्षम वेळी अशी विधाने टाळायला हवी होती, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

तरुणांच्या महत्त्वाकांक्षेवर भाष्य-
जय पवार यांच्या उमेदवारीबाबत बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, “दादा (अजित पवार) नेहमी म्हणायचे की जयने या राजकीय व्यापात पडू नये, हे क्षेत्र चांगले नाही. मात्र, लोकांच्या आग्रहामुळे किंवा सभोवतालची परिस्थिती पाहून जयच्या मनात इच्छा निर्माण झाली असावी. तो दादांचा मुलगा आहे, त्यामुळे इच्छा असणे चुकीचे नाही. २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनी माघार घेऊन जयला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.” रोहित पवारांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जरी ते वडील असले तरी रोहितचे राजकीय निर्णय तो स्वतः घेतो. नवीन पिढीला वडिलांचेच विचार पटतील असे नाही, हे वास्तवही त्यांनी मांडले.

पवार विरुद्ध पवार संघर्षाची शक्यता आणि पक्षाची भूमिका-
भविष्यात युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना होणार का? या प्रश्नावर श्रीनिवास पवारांनी अधिकृत निर्णय ‘पक्षाच्या प्रमुखांवर’ सोपवला. “युगेंद्र हे शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत, तर जय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. २०२९ ला कोणता पक्ष कोणासोबत असेल, युती असेल की विलीनीकरण, हे आताच सांगणे कठीण आहे. तीन वर्षे हा राजकारणातील मोठा काळ असतो. अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेबच घेतील आणि पक्षातर्फे जे ठरवले जाईल, तेच फायनल असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विलीनीकरणाची प्रक्रिया आणि अजितदादांची उणीव-
अजित पवारांच्या पश्चात पक्षातील विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना श्रीनिवास पवार भावूक झाले. ते म्हणाले, “दादांची कार्यपद्धती वेगळी होती; ते एकहाती निर्णय घेऊ शकत होते आणि पक्षावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. आता दादांनंतर मुलं अद्याप लहान आहेत आणि वहिनींसाठी हे क्षेत्र नवीन आहे. दादांना जाऊन अजून तीन महिनेही झाले नाहीत, या धक्क्यातून सावरणे कुटुंबासाठी कठीण आहे. सध्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने कारभार सुरू आहे. परिस्थिती बदलली असून कुटुंब म्हणून ही मोठी उलथापालथ आहे.”

राजकीय टायमिंगवर नाराजी-
रोहित आणि जय या दोघांच्या वक्तव्यांच्या वेळेवर श्रीनिवास पवारांनी नापसंती व्यक्त केली. “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, आपण सर्वजण दादांसाठी आणि या निवडणुकीसाठी एकत्र उभे आहोत. बारामतीकरांना ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष नको आहे, हे माहिती असूनही अशी विधाने करणे चुकीचे आहे. जर कोणाला चुकीचा संघर्ष घडवायचा असेल, तर पवारांनी एकत्र बसून सामोपचाराने निर्णय घ्यायला हवा. भाजपला दोष देऊन उपयोग नाही, स्वतःच्या वागण्यात सुधारणा हवी,” अशा शब्दांत त्यांनी उभयतांना कानपिचक्या दिल्या.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या