Home / देश-विदेश / AAP : आप पक्षात ऑपरेशन लोटस! केजरीवालना धक्का ! भाजपाने राज्यसभेचे 10 पैकी 7 खासदार फोडले

AAP : आप पक्षात ऑपरेशन लोटस! केजरीवालना धक्का ! भाजपाने राज्यसभेचे 10 पैकी 7 खासदार फोडले

AAP : आम आदमी पक्षाचे (आप) अरविंद केजरीवाल यांना आज जबर धक्का बसला. आपचे राज्यसभेतील दहा खासदारांपैकी 7 खासदार भाजपाने...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

AAP : आम आदमी पक्षाचे (आप) अरविंद केजरीवाल यांना आज जबर धक्का बसला. आपचे राज्यसभेतील दहा खासदारांपैकी 7 खासदार भाजपाने फोडले. आता आपच्या संस्थापक सदस्यांपैकी फक्त संजय सिंह आणि आतिषी हे दोघे केजरीवाल यांच्यासोबत राहिले आहेत. आपच्या गुन्ह्यांत आम्ही सहभागी राहू शकत नाही, अशी गंभीर टीका करीत आज खासदारांनी आपला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

सध्या सामान्यांचे विविध प्रश्न मांडल्याने लोकप्रिय झालेले आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी आज ‘आप’ला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर आपचे दोन तृतियांश खासदार भारताच्या संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपामध्ये विलीन होणार आहेत, अशी माहिती देत आपचे 7 खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या घोषणेने खळबळ माजली असून, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता भाजपाने ‘आप’ला संपवण्याची खेळी खेळली आहे. आपने या पक्षफोडीचे सारे खापर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर फोडले आहे. ‘आप’ला एवढे मोठे खिंडार पडल्यावर आप पक्ष टिकवणे केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. जे खासदार फुटले ते सर्व पंजाबचे आहेत. पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणूक असल्याने ही कारस्थाने सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे संजय मित्तल यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने छापा टाकला होता. महाराष्ट्रातही शिंदे सेना किंवा उबाठा कोणत्याही क्षणी फोडली जाईल अशी कुजबुज आहे. मात्र महाराष्ट्रात आता निवडणुका नसल्याने तूर्त ही फोडाफोडी थांबली आहे.


आपने 2 एप्रिल रोजी राज्यसभा खासदारांच्या उपनेतेपदावरून राघव चढ्ढाला हटवले होते. राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्यासाठी वेळ देऊ नये असेही कळवले होते. त्यामुळे आप आणि राघव यांच्यात दुरावा वाढला होता. आज त्यांच्याबरोबर सदीप पाठक आणि अशोक मित्तल हेही भाजपात गेले. विशेष म्हणजे, आपने राघव यांच्या जागी उपनेतेपदी म्हणून निवड केली, ‘लव्हली युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू ते अशोक मित्तल हेही राघव चढ्ढा यांच्यासोबत भाजपात गेले आहेत. उपनेते होताच त्यांच्यावर ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. याशिवाय क्रिकेटपटू हरभजनसिंह, विक्रमजीत साहनी, राजेंद्र गुप्ता आणि स्वाती मालिवाल हेही आप सोडून भाजपात जाणार असल्याचे राघव चढ्ढा यांनी आज जाहीर केली.


राघव चढ्ढा यांनी आज पत्रकार परिषद घेतली तेव्हा संदीप पाठक आणि अशोक मित्तल उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राघव चढ्ढा म्हणाले की, आम्ही म्हणजेच राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्यांनी भारताच्या संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ‘आप’ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची 15 वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपली मूळ तत्त्वे, मूल्ये आणि नैतिकतेपासून भरकटला आहे. हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते की, मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की, मी ‘आप’पासून वेगळा होत आहे आणि जनतेच्या जवळ जात आहे.


राघव चढ्ढा पुढे म्हणाले की, मी पक्षात येण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट होतो. त्यावेळी माझ्यासोबत विविध क्षेत्रांतील लोक आपमध्ये सामील झाले होते. या सर्व लोकांनी भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याच्या निर्धाराने, आपले सर्वस्व अर्पण करून या पक्षाची स्थापना केली होती. आपले सर्व काही सोडून ते हा भ्रष्टाचारमुक्त पक्ष स्थापन करण्यासाठी आले होते. मी या पक्षाचा संस्थापक सदस्य होतो. त्यामुळे या पक्षाबाबत माझ्यापेक्षा चांगले कोणालाच माहीत नसेल. आम्ही सर्वांनी मिळून, पूर्ण वचनबद्धतेने आणि निष्ठेने दिल्लीत हा पक्ष स्थापन केला आणि इतर राज्यांमध्ये त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पण आज, अत्यंत दुःख आणि शरमेने मला हे सांगावे लागत आहे की, भ्रष्टाचार संपवण्याच्या शपथेने स्थापन झालेला हा पक्ष आता भ्रष्ट आणि तडजोड करणार्‍या लोकांच्या हातात गेला आहे. म्हणूनच आज अनेकांनी पक्ष सोडला आहे. अजूनही सोडत आहेत. आम्ही आमची कारकीर्द बनवण्यासाठी पक्षात कधीच आलो नव्हतो. तर कारकीर्द सोडून देशहितासाठी इकडे आलो होतो. पण आता हा पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मी बोलत नव्हतो. मी वाट पाहत होतो की, परिस्थिती सुधारेल. पण आता मी खरे कारण सांगतो की, मी त्यांच्या पापांत गुन्हेगार होऊ इच्छित नव्हतो. मी अशा वळणावर उभा होतो की, आम्ही राजकारण सोडावे किंवा पंधरा-सोळा वर्षे जे काम केले, त्याचा त्याग करावा किंवा आमचा अनुभव, स्किल, ऊर्जा यांचा वापर करून सकारात्मक राजकारण करावे. म्हणून आम्ही दोन तृतियांश खासदार संविधानातील तरतुदीचा वापर करून पक्ष सोडणार आहोत. हा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिला आहे.


ही घोषणा करून राघव चढ्ढा यांनी लगेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. ते म्हणाले की, गेली बारा वर्षे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक ठोस कामे केली आहेत. यापूर्वीचे नेते निर्णय घ्यायला घाबरत होते. मग तो दहशतवादची मुळे उखडणे असो की, देशाला जगाच्या तीन सर्वोत्तम अर्थव्यवस्थेत आणणे असो. मोदीच्या नेतृत्वावर जनतेने तीनवेळा मोहोर उमटवली आहे. आम्ही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जाऊन देशाच्या हिताचे काम करणार आहोत.


या घोषणेनंतर केजरीवाल यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देताना एवढेच म्हटले की, भाजपाने पुन्हा पंजाबी लोकांसोबत दगाबाजी केली आहे. तर आपकडून खासदार संजय सिंग आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषद घेऊन राघव चढ्ढांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. संजय सिंग म्हणाले की, अमित शहा यांनीच आमचा पक्ष फोडला आहे. राजिंदर गुप्ता, साहनी, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल या सर्वांना आम आदमी पार्टीने जमिनीवरून उचलून संसदेत आणले होते. पण त्यांनी पंजाबच्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी लोकांच्या हितासाठी काम करणार्‍या पंजाब सरकारला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने ही सात नावे लक्षात ठेवली पाहिजेत. पक्षाने राघव यांना काय काय दिले. पंजाबच्या जनतेने त्यांना राज्यसभेत पाठवले. तुम्ही भाजपाच्या मांडीवर येऊन बसलात. पंजाबच्या जनतेच्या प्रेमामुळे संदीप यांना राज्यसभेत प्रवेश करण्याची संधी मिळाली. आता तुम्ही पंजाबच्या शेतकर्‍यांविरुद्ध काळे कायदे करणार्‍या पक्षात जाऊन प्रामाणिकपणा आणि सत्याबद्दल बोलत आहात. तुम्हाला त्यांच्यात सामील होऊन क्रांती करायची आहे का? स्वातंत्र्यापासून भाजपा हा जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे.तुम्ही तिथे जाऊन प्रामाणिकपणे जगणार. तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? पंजाबमध्ये भगवंत मान चांगले काम करत आहेत. आज त्या सरकारविरोधात ‘ऑपरेशन लोटस’ खेळले जात आहे. खासदारांना बदनाम केले जात आहे. ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक मित्तल यांच्या घरावर छापा टाकून त्यांना उद्ध्वस्त केले. मला मोदी आणि शहा यांना सांगायचे आहे की, तुम्ही पंजाबच्या जनतेसोबत आणि आम आदमी पार्टीसोबत हा किळसवाणा खेळ खेळला आहे. या विश्वासघातासाठी आणि फसवणुकीसाठी पंजाबची जनता तुम्हाला माफ करणार नाही.
तर भगवंत मान म्हणाले की, लोकांनी आज आमच्या पक्षाच्या खासदारांना फोडले. ही तीच वॉशिंग मशीन आहे जिचा वापर शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी केला गेला. जेव्हा पंजाबी प्रेम करतात, तेव्हा ते मनापासून करतात. जेव्हा त्यांचा विश्वासघात होतो, तेव्हा त्यांची कृती पिढ्यान्पिढ्या लक्षात राहील. आमच्या खासदारांना पक्षात घेतले जात आहे. कारण पंजाबमध्ये त्यांचा स्वतःचा मजबूत आधार नाही. या लोकांनी आज आमच्या पक्षाच्या खासदारांना फोडले. ही तीच वॉशिंग मशीन आहे, जिचा वापर शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी केला गेला. जेव्हा पंजाबी प्रेम करतात, तेव्हा ते मनापासून करतात. जेव्हा त्यांचा विश्वासघात होतो, तेव्हा त्यांची कृती पिढ्यान्पिढ्या लक्षात राहील.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या