Home / महाराष्ट्र / Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’साठी जितेंद्र जोशीची एका रात्रीत निवड; रितेश देशमुखने सांगितला ‘कास्टिंग’चा तो रंजक किस्सा

Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’साठी जितेंद्र जोशीची एका रात्रीत निवड; रितेश देशमुखने सांगितला ‘कास्टिंग’चा तो रंजक किस्सा

Riteish Deshmukh : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहत असून, अभिनेता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने...

By: Team Navakal
Jitendra Joshi
Social + WhatsApp CTA

Riteish Deshmukh : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहत असून, अभिनेता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १ मे रोजी, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या अवाढव्य बजेटमध्ये साकारलेल्या या चित्रपटात मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या भूमिकांची विशेष चर्चा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने जितेंद्र जोशीच्या निवडीचा (कास्टिंग) एक थरारक आणि भावनिक किस्सा सांगितला आहे.

जेव्हा दिग्दर्शक रितेश पेचात अडकला…
रितेश देशमुखने सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी एका कलाकाराची निवड करण्यात आली होती. चित्रपटाचा भव्य सेट तयार होता आणि चित्रीकरणासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि तारखांच्या गोंधळामुळे त्या संबंधित कलाकाराला चित्रीकरणासाठी येणे शक्य झाले नाही. “मी मोठ्या पेचात पडलो होतो. तो सेट ठराविक काळासाठीच होता आणि त्यानंतर मला तो पाडून दुसरा सेट उभा करायचा होता. ती भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याने कोणाची निवड करावी, हे मला सुचत नव्हते,” असे रितेशने आठवणींना उजाळा देताना सांगितले.

जेनेलियाचा सल्ला आणि जितेंद्रचा होकार
या कठीण प्रसंगात रितेशची पत्नी आणि चित्रपटाची निर्माती जेनेलिया डिसूझा हिने जितेंद्र जोशीचे नाव सुचवले. मात्र, उद्या चित्रीकरण असताना आज संध्याकाळी इतक्या मोठ्या कलाकाराला कसे विचारणार, अशी धास्ती रितेशला वाटत होती. तरीही प्रयत्न म्हणून रितेशने जितेंद्रला फोन केला. रितेश म्हणाला, “मी जितूला फोन करून अडचण सांगितली. महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. त्याने जेव्हा विचारले की चित्रीकरण कधी आहे, तेव्हा मी ‘उद्या’ असे उत्तर दिले. संध्याकाळी फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रीकरणाला बोलावणे ही मोठी जोखीम होती, पण जितेंद्रने क्षणाचाही विलंब न लावता ‘चल डन’ असे म्हणत होकार दिला.”

मैत्री आणि महाराजांचा आशीर्वाद
जितेंद्र जोशीने त्याच रात्री ‘लुक टेस्ट’ पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी तो चित्रीकरणासाठी सेटवर हजर झाला. “एका फोनवर केवळ मैत्रीखातर आणि प्रेमापोटी जितेंद्रने जी मदत केली, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा चित्रपट केवळ मेहनतीने नाही, तर महाराजांच्या आशीर्वादानेच पूर्ण होत आहे,” अशा शब्दांत रितेशने जितेंद्रचे कौतुक केले. या चित्रपटात रितेश देशमुख केवळ दिग्दर्शकच नाही, तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या