Home / देश-विदेश / TVK Victory: थलपती विजयच्या चालकाच्या मुलाचा ऐतिहासिक विजय! मंचावर डोळे पुसले अन् आता थेट विधानसभेत

TVK Victory: थलपती विजयच्या चालकाच्या मुलाचा ऐतिहासिक विजय! मंचावर डोळे पुसले अन् आता थेट विधानसभेत

TVK Victory: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एका अशा विजयाची चर्चा होत आहे, ज्यामध्ये भावना आणि राजकीय लाट यांचा अनोखा संगम...

By: Team Navakal
TVK Victory
Social + WhatsApp CTA

TVK Victory: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एका अशा विजयाची चर्चा होत आहे, ज्यामध्ये भावना आणि राजकीय लाट यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. थलपती विजय यांचे विश्वासू सहकारी आणि चालक राजेंद्रन यांचा 30 वर्षीय मुलगा आर. साबरीनाथन याने विरूगमबक्कम मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाच्या या विजयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

२७ हजारांहून अधिक मतांनी विजय

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आर. साबरीनाथन याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठा पराभव केला आहे. त्याने डीएमकेचे उमेदवार प्रभाकर राजा आणि एआयएडीएमकेचे उमेदवार विरूगई रवी यांना चारी मुंड्या चित केले. साबरीनाथनने एकूण 27,086 मतांच्या फरकाने हा विजय संपादन केला. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “या विजयामुळे मला खूप आनंद झाला असून मी थलपती विजय यांचा ऋणी आहे. त्यांनी डीएमकेच्या वर्चस्वाला लगाम लावला आहे.”

मंचावरील ‘तो’ व्हिडिओ ठरला गेमचेंजर

काही आठवड्यांपूर्वी प्रचारादरम्यान साबरीनाथनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मंचावर भाषण करताना साबरीनाथन भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी खुद्द थलपती विजय यांनी पुढे येऊन साबरीनाथनचे डोळे पुसले आणि त्याला मिठी मारली. या एका प्रसंगामुळे साबरीनाथन आणि विजय यांच्यातील वैयक्तिक जिव्हाळा समोर आला आणि सर्वसामान्यांच्या मनात साबरीनाथनबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

चालकाचा मुलगा आता ‘आमदार’

साबरीनाथनचे वडील राजेंद्रन हे विजय यांच्या पहिल्या चित्रपटापासून (नाळैया थीरपू) त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले आहेत. एका चालकाच्या घरातील तरुण आज थेट विधानसभेत पोहोचला आहे, ही बाब टीव्हीके पक्षासाठी खूप मोठी मानली जात आहे. हा केवळ एका जागेचा विजय नसून, निष्ठेचा आणि सामान्य कार्यकर्त्याच्या प्रगतीचा विजय असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

विरूगमबक्कम मतदारसंघाने यावेळी एका नवीन चेहऱ्याला संधी देऊन प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील या नवीन राजकीय लाटेत साबरीनाथनचा विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला आहे.

हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
संबंधित बातम्या