Maharashtra 10th result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी (८ मे) अधिकृतपणे घोषित केला आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. राज्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या निकालाची सविस्तर आकडेवारी सादर केली. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.
विभागीय निकालाची आकडेवारी
राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम राखत ९७.६२ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के इतका लागला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातूर या इतर विभागांच्या निकालातही संमिश्र कल पाहायला मिळत आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निकाल कुठे आणि कसा पाहाल?
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी मंडळाने विविध संकेतस्थळे उपलब्ध करून दिली आहेत. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही लिंकवर आपला निकाल पाहू शकतात:
१. mahahsscboard.in
२.sscresult.mahahsscboard.in
३. results.digilocker.gov.in
निकाल पाहण्याची प्रक्रिया-
संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘SSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आपला ‘सीट नंबर’ आणि आईच्या नावाचे पहिले अक्षर (Mother’s First Name) इंग्रजीत टाईप करून ‘View Result’ या बटणावर क्लिक केल्यास गुणपत्रिका पडद्यावर दिसेल. इंटरनेटची सुविधा नसल्यास विद्यार्थी ५७७६६ या क्रमांकावर MHSSC असा मेसेज पाठवूनही आपला निकाल प्राप्त करू शकतात.
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन (Rechecking)-
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका आहे किंवा जे पुनर्मूल्यांकन करू इच्छितात, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल. ज्यांना पुनर्मूल्यांकन (Revaluation) करायचे आहे, त्यांच्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच कार्यालयीन दिवसांच्या आत विहित शुल्क भरून विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल.
आज दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन गुणपत्रिका पाहता येणार असली, तरी मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळांमधून ठराविक मुदतीनंतर वितरित करण्यात येतील.










