Narendra Modi : पश्चिम बंगालमधील सत्तांतराच्या ऐतिहासिक सोहळ्यात आज एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यात व्यासपीठावर आगमन होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचारा पलीकडे जात भारतीय जनता पक्षाचे ९२ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. केवळ नमस्कार करून न थांबता, पंतप्रधानांनी त्यांना मायेने मिठी मारली आणि शाल देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. या एका कृतीने पंतप्रधानांनी पक्षसंघटनेसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका निस्पृह तपस्व्याचा आणि जनसंघाच्या संघर्षाचा सन्मान केला आहे.
कोण आहेत माखनलाल सरकार?
माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आणि निष्ठवान स्तंभांपैकी एक मानले जातात. वयाची नव्वदी ओलांडली असली तरी, आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुण कार्यकर्त्याला लाजवेल असाच आहे. माखनलालजींचा राजकीय प्रवास हा भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून सुरू झाला. भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले असून, मुखर्जींच्या विचारांना आणि तत्त्वांना त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
‘एक विधान, एक निशान, एक प्रधान’ आंदोलनातील सहभाग-
१९५३ च्या सुमारास काश्मीरमध्ये स्वतंत्र ध्वज आणि तिथे प्रवेशासाठी लागणाऱ्या ‘परमिट’ (परवाना) पद्धतीविरुद्ध डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. “एका देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन प्रधान चालणार नाहीत,” ही गर्जना करत जेव्हा मुखर्जी काश्मीरच्या दिशेने निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत हजारो सत्याग्रही होते. त्या काळी तरुण असलेल्या माखनलाल सरकार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. पंजाब आणि जम्मूच्या सीमेवर (माधोपूर येथे) जेव्हा डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्यासोबत माखनलाल सरकार यांनाही अटक झाली होती. या राष्ट्रीय कारजासाठी त्यांनी प्रदीर्घ तुरुंगवासही भोगला होता.
संघर्षाचे फळ: बंगालमध्ये भाजपचे पहिले सरकार-
ज्या बंगालच्या भूमीत जनसंघाची बीजे रोवली गेली, त्याच भूमीत आज पहिल्यांदाच भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले आहे. हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी माखनलाल सरकार व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यांदेखत झालेला हा सत्तापालट म्हणजे त्यांनी सात दशकांहून अधिक काळ केलेल्या संघर्षाचे फळ मानले जात आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा २०२६: अंतिम निकाल-
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश अभूतपूर्व आहे. विधानसभेच्या एकूण २९३ जागांपैकी भाजपने स्वबळावर २०७ जागा जिंकून बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे, प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसची घसरण झाली असून त्यांना केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.












