Home / देश-विदेश / Tamil Nadu : विजय यांनी अखेर बहुमताचा 118 आकडा जुळवला! व्हीसीके, आययूएमएलचा पाठिंबा! औपचारिक पत्र दिले

Tamil Nadu : विजय यांनी अखेर बहुमताचा 118 आकडा जुळवला! व्हीसीके, आययूएमएलचा पाठिंबा! औपचारिक पत्र दिले

Tamil Nadu : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटूनही न सुटलेला सत्तास्थापनेचा पेच आज अखेर सुटला....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Tamil Nadu : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटूनही न सुटलेला सत्तास्थापनेचा पेच आज अखेर सुटला.  या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणार्‍या विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहुमताचा 118 गाठता न आल्याने राज्यपालांनी दोन वेळा परत पाठवले होते. आज व्हीसीके आणि आययूएमएल या दोन छोट्या पक्षांनी टीव्हीकेला पाठिंब्याचे औपचारिक पत्र दिले. त्यामुळे टीव्हीकेचे बहुमताचे 118 आमदारांचे गणित जुळून सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.


234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी दोन जागा टीव्हीके प्रमुख विजय यांनी जिंकल्या आहेत. त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. परिणामी, टीव्हीकेकडे 107 आमदार आहेत. काँग्रेसच्या पाच आणि भाकप व माकपच्या प्रत्येकी दोन आमदारांचा पाठिंबा दिला होता. त्यामुळे टीव्हीकेचे संख्याबळ 116 वर पोहेचले होते. परंतु कागदावर बहुमत असल्याशिवाय शपथ देणार नाही, अशी भूमिका राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतली. त्यामुळे विजय यांना राजभवनातून रिकाम्या हाताने परतावे लागले होते. बहुमत जुळत नसल्याने विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी दोन वेळा रद्द करावा लागला. काल टीव्हीकेने व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल)  या पक्षांशी बोलणी सुरू केली होती.  

या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. यातील एका पक्षाने पाठिंबा दिला, तर विजय यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकत होते. परंतु या पक्षांनी टीव्हीकेला तसे पत्र न दिल्याने सत्ता स्थापनेचा मुहुर्त लांबणीवर पडला. व्हीसीके उपमुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने पाठिंब्याचे पत्र दिले नाही, असे नंतर सांगितले गेले. काल टीव्हीके या आणखी एका पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. या पक्षाचा एकमेव आमदार आहे. मात्र टीव्हीकेच्या दाव्यानंतर अर्ध्या तासात एएमएमकेचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरण यांनी राज्यपालांना फोन करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या पक्षाच्या एकमेव आमदाराची स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप दिनकरण यांनी केला. काही वेळातच आमदार कामराज यांच्यासह दिनकरण यांनी राज्यपालांची भेट घेऊन ‘टीव्हीके’वर घोडेबाजाराचा आरोप केला. कामराज यांनी ती स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितले. दुसरीकडे, टीव्हीकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यात कामराज विजय यांना पाठिंब्याचे पत्र लिहिताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

अखेर आज टीव्हीकेच्या व्हीसीकेशी वाटाघाटी यशस्वी होऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला. पाठोपाठ आययूएमएलचेही बिनशर्त समर्थन मिळाले. ही समर्थनाची पत्रे घेऊन विजय तिसर्‍यांदा राज्यपालांच्या भेटीला गेले. या पत्रांना राज्यपालांनी मंजुरी दिली असून उद्या सकाळी 10 वाजता विजय यांचा शपथविधी होणार आहे. 13 मे पर्यंत त्यांना विश्‍वासदर्शक ठराव मांडून जिंकावा लागणार आहे.
दरम्यान, घोडेबाजाराच्या भीतीने काँग्रेसने आपले पाच आमदार हैदराबादला पाठवले आहेत. मेलूरचे आमदार पी. विश्वनाथन हे आमदारांच्या या गटाचे नेतृत्व करत आहेत. टीव्हीकेचे सरकार स्थापन झाल्यास पी. विश्वनाथन यांना मंत्री केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या