Mamata Banerjee X Bio Change : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा (TMC) मोठा पराभव झाल्यानंतर आणि भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी अखेर माघार घेतल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या ममतांनी आता आपल्या ‘X’ (ट्विटर) प्रोफाईलमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे.
ममतांच्या ‘X’ बायोमध्ये काय बदल झाला?
शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या प्रोफाईलवर ‘पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्री’ असा उल्लेख होता. मात्र, शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांनी आपला बायो अपडेट केला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःच्या नावापुढे ‘माजी’ (Former) हा शब्द वापरण्याचे टाळले आहे. त्याऐवजी त्यांनी स्वतःचे वर्णन “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (15 वी, 16 वी, 17 वी विधानसभा)” असे केले आहे. तसेच 1997 मध्ये स्थापन केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षा असाही उल्लेख त्यात कायम आहे.
सोशल मीडियावर रंगली होती चर्चा
ममता बॅनर्जी यांनी आपला बायो अपडेट न केल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक युजर्सनी एलन मस्क यांना टॅग करून त्यांचे प्रोफाईल अपडेट करण्याची किंवा खाते निलंबित करण्याची मागणी केली होती. एका पत्रकाराने ट्विट करत म्हटले की, “ममतांनी अत्यंत हुशारीने ‘माजी’ शब्द न वापरता केवळ विधानसभेचा उल्लेख करून आपली ओळख बदलली आहे.”
जेव्हा ममतांनी राजीनामा देण्यास नकार दिला
निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ममता बॅनर्जी अत्यंत आक्रमक भूमिकेत होत्या. त्यांनी राजभवनावर जाऊन राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांनी आरोप केला होता की, निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मते लुटली आहेत. “नैतिकदृष्ट्या विजय आमचाच झाला आहे, त्यामुळे मी दबावाखाली येऊन राजीनामा देणार नाही,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले होते.
पुन्हा एकदा ‘स्ट्रीट फायटर’ भूमिकेत
ममता बॅनर्जी यांनी आता विरोधी पक्षाची धुरा सांभाळण्याचे संकेत दिले आहेत. “मी आता एक मुक्त पक्षी आहे. मी पूर्वी रस्त्यावर उतरून लढा दिला होता आणि पुन्हा एकदा तेच करणार आहे,” असे विधान त्यांनी केले. 2011 मध्ये ज्या ‘स्ट्रीट फायटर’ प्रतिमेमुळे त्यांनी डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावली होती, आता त्याच भूमिकेत त्या पुन्हा दिसणार आहेत.
या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या जागा 215 वरून थेट 80 वर आल्या आहेत. दुसरीकडे, भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत 207 जागा जिंकून बंगालमध्ये पहिले सरकार स्थापन केले आहे.












