Vilas Ghule case : बीड जिल्ह्यातील केज परिसरात हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले आहे. एका हॉटेलमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या विलास घुले यांच्यावर काही इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक हत्याप्रकरणात थेट बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ बजरंग सोनवणे यांचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संशयित आरोपींना अटक न झाल्याने आणि पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचे नाव दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत, मृत विलास घुले यांच्या संतप्त नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यासमोर तब्बल ११ तास मृतदेह ठेवून तीव्र ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी नातेवाईकांच्या जवाबाच्या आधारे सौरभ सोनवणे याच्या नावाचा गुन्ह्यात समावेश केल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हे माझ्या मुलाविराेधात जाणीवपूर्वक सुरू असलेले राजकारण; खासदार बजरंग सोनवणे यांचा दावा-
आपल्या मुलावर थेट हत्येच्या सूत्राधार असण्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. टाकळी फाट्यावर घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की, “गेल्या तीन दिवसांपासून मी सातत्याने हीच भूमिका मांडत आहे की, ही घटना कशामुळे आणि का घडली, याच्या मुळाशी गेले पाहिजे. मूळ भांडण नेमके कशामुळे झाले? विनाकारण कोणी कोणावर हल्ला करत नाही, घुले केवळ भांडण सोडवण्यासाठी तेथे गेले होते.” आपल्या मुलाचे नाव यात ओढले जाण्यामागे जाणीवपूर्वक केले जाणारे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. मृताच्या कुटुंबीयांच्या भावनांबद्दल आपले काही म्हणणे नसले, तरी स्थानिक पातळीवरील काही राजकीय मंडळी या संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांना चेतवण्याचे काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या तपासात आपले कुटुंब पूर्ण सहकार्य करणार असून, पोलीस यंत्रणेला लागेल ती सर्व मदत देण्यास आपण, आपला मुलगा आणि संपूर्ण कुटुंब तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांची सावध प्रतिक्रिया; तपासाकडे सर्वांचे लक्ष-
या हाय-प्रोफाइल हत्याकांडावर बीडमधील इतर प्रमुख राजकीय नेत्यांनी देखील आपली मते व्यक्त केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, पोलिसांचा तपास सध्या योग्य दिशेने सुरू आहे. खासदार बजरंग सोनवणे हे स्वतः कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याने तपासात अडथळा येणार नाही, तसेच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या विषयावर राजकारण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धस यांनीही या प्रकरणी अत्यंत सावध आणि न्याय्य भूमिका घेतली आहे. विलास घुले यांच्यासोबत घडलेल्या या अमानुष घटनेचे समाजात कोणीही समर्थन करू शकत नाही, असे सांगत त्यांनी विलासला न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी केली.










