Home / देश-विदेश / Toll Plazas: टोल नाके इतिहास जमा होणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; आता जेवढा प्रवास, तेवढाच टोल; पाहा काय आहे नवीन सिस्टिम

Toll Plazas: टोल नाके इतिहास जमा होणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; आता जेवढा प्रवास, तेवढाच टोल; पाहा काय आहे नवीन सिस्टिम

India to remove physical toll plazas by 2026 : भारतातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. हायवेवरील...

By: Team Navakal
India to remove physical toll plazas by 2026
Social + WhatsApp CTA

India to remove physical toll plazas by 2026 : भारतातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. हायवेवरील प्रवासादरम्यान आता तुम्हाला टोल नाक्यांवर थांबण्याची किंवा गाडीचा वेग कमी करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की, सरकार 2026 च्या अखेरीस देशातील सर्व प्रत्यक्ष टोल नाके (Toll Plazas) टप्प्याटप्प्याने बंद करून त्याजागी पूर्णपणे स्वयंचलित टोल संकलन यंत्रणा लागू करणार आहे.

थांबण्याची गरज नाही, थेट प्रवासातच टोल कट होणार

नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, नवीन तंत्रज्ञानामुळे वाहने हायवेच्या वेगाने सुरू असतानाच टोलचे पैसे आपोआप कापले जातील. हे संकलन तुम्ही किती अंतर प्रवास केला आहे, यावर आधारित असेल. यासाठी हायवेवर प्रगत नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे आणि फास्टॅग (FASTag) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सध्या देशातील 85 ठिकाणी या यंत्रणेची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे.

MLFF टोलिंग सिस्टिम म्हणजे काय?

सरकार देशभरात ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) टोलिंग सिस्टिम सुरू करण्याची तयारी करत आहे. यामध्ये पारंपारिक टोल नाक्यांऐवजी हायवेवर ठराविक अंतरावर ओव्हरहेड गॅन्ट्री (लोखंडी सांगाडे) लावले जातील. त्यावर कॅमेरे, सेन्सर आणि फास्टॅग रीडर्स असतील. जेव्हा एखादे वाहन याखालून जाईल, तेव्हा सिस्टिम आपोआप टोलची गणना करून लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे वळते करेल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि इंधनाचीही मोठी बचत होईल.

टोलचे दर कमी होण्याची शक्यता

अंतर-आधारित टोल मॉडेलमुळे अनेक प्रवाशांचा खर्च कमी होऊ शकतो. गडकरींच्या मते, ज्या ठिकाणी सध्या 125 ते 150 रुपये टोल आकारला जातो, तिथे तुम्ही किती अंतर कापले आहे त्यानुसार हा दर 15 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. तुम्ही महामार्गाचा जेवढा भाग वापराल, तेवढेच पैसे तुम्हाला मोजावे लागतील.

फास्तॅग अनिवार्य राहणार

जरी रस्ते प्रत्यक्ष टोल नाके मुक्त झाले, तरी फास्टॅग ही या नवीन यंत्रणेचा अविभाज्य भाग असेल. ज्या वाहनांचे फास्टॅग निष्क्रिय असतील किंवा खात्यात पुरेसा बॅलन्स नसेल, त्यांना डिजिटल नोटीस पाठवली जाईल. वेळेत टोल न भरल्यास दंड किंवा दुप्पट रक्कम आकारली जाऊ शकते.

प्रवासाचा अनुभव बदलणार

या नवीन बदलामुळे दिल्ली-जयपूर, दिल्ली-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू यांसारख्या प्रमुख कॉरिडॉरसह संपूर्ण भारतातील लांब पल्ल्याचा प्रवास विनाअडथळा आणि जलद होईल. मालवाहू वाहनांसाठी देखील यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

हे देखील वाचा – Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी अखेर स्वीकारला पराभव? ‘X’ वरील बायोमध्ये केला ‘हा’ मोठा बदल

Web Title:
संबंधित बातम्या