Haldiram’s in London: युनायटेड किंगडममध्ये (UK) राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय फूड चेन असलेल्या ‘हल्दीराम’चे (Haldiram’s) पदार्थ आता लंडनच्या गजबजलेल्या रस्त्यांवर चाखायला मिळणार आहेत. जर तुम्हाला घरची तिखट नमकीन, मिठाई किंवा अस्सल देशी चव आठवत असेल, तर आता तुमची ही प्रतीक्षा संपणार आहे. हल्दीराम या उन्हाळ्यात लंडनमध्ये आपले पहिले मोठे रेस्टॉरंट सुरू करत आहे.
लेस्टर स्क्वेअरमध्ये रंगणार मेजवानी
लंडनच्या प्रसिद्ध लेस्टर स्क्वेअर भागात हे नवीन रेस्टॉरंट थाटले जाणार आहे. ‘ईस्टर्न आय’च्या रिपोर्टनुसार, जून 2026 मध्ये हे रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. सुमारे 3,000 स्क्वेअर फूट जागेत पसरलेल्या या ठिकाणी भारतीय स्ट्रीट फूड, चाट, विविध भाज्या आणि मिठाई अशा पदार्थांची रेलचेल असेल. 1937 मध्ये सुरू झालेली ही कंपनी आधीच सुपरमार्केटमध्ये आपली पाकिटे विकत आहे, मात्र आता परदेशात मोठे रेस्टॉरंट सुरू करून कंपनीने नवा टप्पा गाठला आहे.
पुढच्या पिढीचे नेतृत्व
लंडनमधील या विस्ताराचे नेतृत्व संस्थापक कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य रिया अगरवाल करत आहेत. लंडनची निवड करण्यामागे तेथील मोठी दक्षिण आशियाई लोकसंख्या आणि भारतीय खाद्यसंस्कृतीबद्दल वाढलेली ओढ हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. रिया अगरवाल यांच्या मते, परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही चव त्यांच्या घरच्या आठवणी ताज्या करणारी ठरेल.
काय असेल खास मेनू?
लंडनमधील हे आऊटलेट केवळ ‘क्विक सर्व्हिस’ स्वरूपाचे नसेल, तर तिथे आरामात बसून जेवणाचा आनंद घेता येईल.
- लोकप्रिय पदार्थ: छोले भटूरे, पावभाजी, राज कचोरी आणि विविध प्रकारचे चाट येथे उपलब्ध असतील.
- फ्यूजन डेझर्ट्स: यूकेमधील ग्राहकांसाठी खास ‘फ्यूजन मिठाई’ देखील तयार केल्या जाणार आहेत.
- रिटेल काउंटर: जेवणासोबतच पॅकेज्ड स्नॅक्स आणि टेक-अवे उत्पादने घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.
हल्दीरामच्या या निर्णयामुळे आता लंडनच्या मध्यवर्ती भागात भारतीय खाद्यसंस्कृतीचा सुगंध दरवळणार आहे.
हे देखील वाचा – Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी अखेर स्वीकारला पराभव? ‘X’ वरील बायोमध्ये केला ‘हा’ मोठा बदल












