Home / देश-विदेश / Tiger Death Cases : अवघ्या आठवड्यात ५ वाघांचा मृत्यू; कान्हात कुत्र्यांपासून पसरलेल्या घातक CDV विषाणूने खळबळ

Tiger Death Cases : अवघ्या आठवड्यात ५ वाघांचा मृत्यू; कान्हात कुत्र्यांपासून पसरलेल्या घातक CDV विषाणूने खळबळ

Tiger Death Cases : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प (Kanha Tiger Reserve) येथे अवघ्या एका आठवड्यात वाघीण आणि तिच्या चार...

By: Team Navakal
Tiger Death Cases
Social + WhatsApp CTA

Tiger Death Cases : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प (Kanha Tiger Reserve) येथे अवघ्या एका आठवड्यात वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. २१ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत टी-१४१ या वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा एकामागोमाग मृत्यू झाला असून या सर्व मृत्यूमागे ‘केनाईन डिस्टेंपर व्हायरस’(Canine Distemper Virus) म्हणजेच CDV हा कुत्र्यांपासून पसरणारा घातक विषाणू कारणीभूत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे वन्यजीव संवर्धन यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून देशातील इतर व्याघ्र प्रकल्पांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

मृत वाघीण आणि बछड्यांचे नमुने जबलपूर येथील ‘स्कूल ऑफ वाइल्डलाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ’ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात पाचही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हा विषाणू प्रामुख्याने कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो, मात्र अलीकडील काळात तो वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये म्हणजेच canine ऐवजी feline वर्गीय प्राण्यांमध्ये पसरताना दिसत आहे, त्यामुळेच वाघ आणि बिबट हे मांजर वर्गीय प्राणी केनाईन डिस्टेंपर वायरसमुळे आजारी पडत आहेत. ही बाब वनविभागासाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, या विषाणूचा प्रसार अनेक मार्गांनी होऊ शकतो. वाघ किंवा बिबट्यांनी केलेली शिकार अनेकदा अर्धवट सोडली जाते आणि नंतर ती पुन्हा खाण्यासाठी ते परत येतात. या दरम्यान जंगलालगतच्या गावांमधील कुत्रे त्या शिकारीवर ताव मारतात आणि जर ते संक्रमित असतील, तर त्या माध्यमातून विषाणू वाघांपर्यंत पोहोचतो. तसेच पाणवठ्यांमध्ये संक्रमित कुत्र्यांच्या संपर्कामुळे पाणी दूषित होऊन त्यातूनही संसर्ग होऊ शकतो. काही वेळा वाघांनी थेट संक्रमित कुत्र्यांची शिकार केल्यासही विषाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करतो.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घटना घडलेल्या सरही सेक्टरमध्ये सुमारे पाच चौ.किलोमीटर परिसर ‘नो गो झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात हत्तीवरून गस्त वाढवण्यात आली असून सुमारे ४० कॅमेरा ट्रॅप बसवून वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय पाणवठ्यांचे आणि प्राण्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून तपासणी सुरू आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे ८० गावांमधील कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरणही हाती घेण्यात आले आहे, कारण वाघांचे थेट लसीकरण करणे व्यवहार्य नाही.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो, मात्र वाघ आणि बिबट्यांमध्ये तो अधिक गंभीर स्वरूप धारण करतो. श्वसनसंस्थेसोबतच हा विषाणू मज्जासंस्थेवरही परिणाम करतो, ज्यामुळे वर्तनात बदल, दिशाभूल, शिकार करण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये प्राणी आपली नैसर्गिक प्रवृत्तीही विसरू शकतात, अशी गंभीर स्थिती निर्माण होते.

दरम्यान, सरही सेक्टर परिसरातील गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाघांच्या मृत्यूमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. वनविभागाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रातही संसर्गाचा धोका?

या घटनेनंतर केवळ कान्हापुरतीच नव्हे तर इतर व्याघ्र प्रकल्पांबाबतही चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील वाघांनाही अशाच प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे या भागांमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कॅनाईन डिस्टेंपर विषाणू म्हणजे काय?

२०१५ साली पन्ना व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. तसेच २०१२ ते २०१७ या कालावधीत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने (IVRI) केलेल्या तपासणीत ११ वाघ, १७ बिबट्या आणि ५४ सिंहांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. कॅनाईन डिस्टेंपर हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असून तो प्रामुख्याने पाळीव कुत्र्यांमधून वन्य प्राण्यांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून किंवा त्यांच्या स्रावांद्वारे हा विषाणू जलद गतीने इतर प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो.

एकूणच, कुत्र्यांपासून पसरणारा हा विषाणू आता वाघांसारख्या महत्त्वाच्या वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका बनला असून, वेळेत प्रभावी उपाययोजना न केल्यास याचे गंभीर परिणाम देशातील वाघसंवर्धनावर होऊ शकतात, असा इशारा या घटनेतून स्पष्टपणे मिळत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या