PM Modi Appeal: मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून महत्त्वपूर्ण आवाहन केले.
विदेशी चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी इंधनाचा वापर कमी करावा, पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीकडे वळावे आणि लग्नसराईत किमान 1 वर्ष सोन्याची खरेदी टाळावी, असे आग्रहाचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
इंधन बचत हाच राष्ट्रहित: पंतप्रधान
इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलरवरून थेट 126 डॉलरवर पोहोचल्या आहेत. या संकटामुळे जगात पेट्रोल-डिझेल महागले आहे. पंतप्रधान म्हणाले, “कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सवय लावून घेतली होती. आजच्या काळात देशहितासाठी या सवयी पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.” पेट्रोल-डिझेलवर खर्च होणारे विदेशी चलन वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोनं खरेदी आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा
पंतप्रधानांनी केवळ इंधनावरच नव्हे, तर इतर आयातीवरही भाष्य केले. “मी लोकांना आवाहन करतो की, किमान 1 वर्ष लग्नासाठी सोन्याची खरेदी करू नका,” असे ते म्हणाले. याशिवाय, खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने त्याचा वापर थोडा कमी करावा, ज्यामुळे देशाची तिजोरी आणि कुटुंबाचे आरोग्य दोन्ही सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनाही रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांनी कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 15 मे पूर्वी मोठी वाढ होऊ शकते. गेल्या 4 वर्षांतील ही सर्वात मोठी दरवाढ असण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना दरमहा 30,000 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. सध्या सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 24 रुपये आणि डिझेलवर 30 रुपये स्वतः सोसत आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेल 4-5 रुपयांनी, तर गॅस सिलेंडर 40-50 रुपयांनी महाग होऊ शकतो.
भारताची आतापर्यंतची भूमिका
श्रीलंका किंवा बांगलादेशप्रमाणे भारतात इंधनाचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने रशिया, अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेतून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. रिफायनरींची क्षमताही 100 टक्क्यांहून अधिक करण्यात आली आहे. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता आता नागरिकांनीही बचतीचा मार्ग अवलंबणे गरजेचे झाले आहे.









