PM Modi : देशातील इंधन बचत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना एक महत्त्वाचे आवाहन केले. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या खासगी वाहनांचा वापर मर्यादित करून नागरिकांनी मेट्रोसारख्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक साधनांना प्राधान्य द्यावे, असे सुचवणारे नऊ महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावर मुंबईतील सामान्य नोकरदार आणि कष्टकरी वर्गातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेत्यांचे ताफे आणि हेलिकॉप्टर प्रवासावर टीकेची झोड-
पंतप्रधानांच्या या सल्ल्यावर रोष व्यक्त करताना मुंबईकरांनी सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींच्या जीवनशैलीवर बोट ठेवले आहे. “सर्वसामान्यांना उपदेश करण्यापूर्वी सरकारने स्वतःमध्ये बदल घडवून आणावा,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. एका मंत्र्यासोबत किंवा नेत्यासोबत दहा-दहा गाड्यांचा ताफा फिरतो, याकडे लक्ष वेधत जनतेने म्हटले आहे की, केवळ छोट्या अंतराच्या प्रवासासाठीही हेलिकॉप्टरचा होणारा अवाढव्य वापर प्रथम थांबवला पाहिजे. मंत्र्यांच्या लवाजम्यावर होणारा खर्च आणि इंधनाचा अपव्यय कमी केल्यास तो खरा आदर्श ठरेल, अशा शब्दांत नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मेट्रोचे भाडे आणि सर्वसामान्यांची आर्थिक ओढाताण-
दुसरीकडे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याच्या मुद्द्यावरही नागरिकांनी सरकारला आरसा दाखवला आहे. मेट्रोचा प्रवास सुखकर असला तरी त्याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत, असा सूर उमटत आहे. “एकिकडे इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे आणि दुसरीकडे मेट्रोचे दरही उच्च आहेत. जर सरकारला खरोखरच प्रदूषण आणि इंधन वापर कमी करायचा असेल, तर मेट्रोचे प्रवास दर लक्षणीयरीत्या कमी करावेत किंवा काही वर्गांसाठी मेट्रो सेवा विनामूल्य करावी,” अशी मागणी मुंबईतील प्रवाशांनी केली आहे.
जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांचे देशवासियांना ‘नवसूत्री’ आवाहन; सुवर्णखरेदी आणि इंधन वापरावर निर्बंधांचे संकेत-
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील एका जाहीर सभेतून जनतेशी संवाद साधला. सध्या जगभरात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, विशेषतः आखाती देशांमधील तणावामुळे विस्कळीत झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, यावर पंतप्रधानांनी भाष्य केले. भारताची आर्थिक स्थिती भक्कम राखण्यासाठी आणि परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी देशवासियांना नऊ विशेष आवाहने केली आहेत. या आवाहनांमुळे भविष्यात देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये नेमके काय बदल होणार, याविषयी आता जनमानसात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
देशाच्या हितासाठी नागरिकांनी पुढील काही काळ संयम पाळावा, अशी विनंती करत पंतप्रधानांनी खालील मुद्दे मांडले आहेत:
१. इंधन आणि खाद्यतेलाचा काटकसरीने वापर: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकत असल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचा वापर अत्यंत मर्यादित आणि गरजेनुसारच करावा.
२. सुवर्णखरेदीला स्थगिती: देशातील परकीय चलन बाहेर जाऊ नये, यासाठी नागरिकांनी पुढील किमान एक वर्ष कोणत्याही प्रकारची सुवर्णखरेदी टाळावी.
३. परदेशी प्रवासावर मर्यादा: परकीय चलनाची बचत करण्यासाठी पर्यटनासाठी केले जाणारे आंतरराष्ट्रीय प्रवास वर्षभरासाठी पुढे ढकलावेत.
४. पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा अवलंब: वैयक्तिक वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा.
५. डिजिटल कार्यसंस्कृतीला प्राधान्य: इंधन आणि वेळेची बचत करण्यासाठी शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातून काम) आणि ऑनलाईन बैठकांवर भर द्यावा.
६. स्वदेशीचा जागर: परकीय उत्पादनांची खरेदी कमी करून स्थानिक वस्तूंना प्राधान्य द्यावे, जेणेकरून देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट होईल.
जनतेमध्ये चिंतेचे आणि कुतूहलाचे वातावरण-
पंतप्रधानांनी थेट जनतेला उद्देशून केलेल्या या आवाहनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः सुवर्णखरेदी आणि परदेश प्रवासासारख्या गोष्टींवर त्यांनी दिलेला भर पाहता, जागतिक संकट किती खोलवर आहे, याची जाणीव नागरिकांना होत आहे.










