NEET-UG 2026 : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘NEET’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासाला मोठी गती प्राप्त झाली आहे. नाशिकमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर, आज पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिबडेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे या ४६ वर्षीय महिलेला अटक केली आहे. या कारवाईमुळे या गैरव्यवहाराचे जाळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होत असून या प्रकरणातील ‘पुणे कनेक्शन’ आता उघड झाले आहे.
ब्युटी पार्लरच्या आडून विद्यार्थ्यांशी संपर्क-
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे ही पुण्यात ब्युटी पार्लर चालवत होती. मात्र, या व्यवसायाच्या आडून तिने विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याचा पोलिसांना संशय आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक करण्यात आलेला संशयित धनंजय लोखंडे याला मनीषा मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढून त्यांना धनंजयपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका तिने बजावल्याचे समजते. पोलिसांनी तिच्या घरातून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असून, त्यामध्ये काही संशयास्पद व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल्सची नोंद आढळली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केल्यानंतर आज सायंकाळपर्यंत मनीषाला सीबीआयच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे.
नाशिकचा संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात-
दुसरीकडे, नाशिकमधून ताब्यात घेतलेला संशयित शुभम खैरनार याला घेऊन सीबीआयचे पथक मध्यरात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले. नाशिक पोलिसांनी शुभमचा ताबा सीबीआयकडे दिल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, शुभम आणि धनंजय यांनी मिळून हा पेपरफुटीचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या नीटचा पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला होता, त्यानंतर शुभमने तोच पेपर ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल १५ लाख रुपयांना पुढे विकल्याचा आरोप आहे.
पोलिस प्रशासनाची भूमिका-
या प्रकरणावर माहिती देताना पुणे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, “नगरमधील संशयित आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही महिला आणि नगरमधील मुख्य आरोपी संगनमताने विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते.” या गैरव्यवहारात पैशांचे मोठे व्यवहार झाल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
देशव्यापी तपासाची व्याप्ती-
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून, सीबीआयने आपली व्याप्ती हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणापर्यंत वाढवली आहे. या रॅकेटमध्ये अनेक आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.











