Raj Thackeray : रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान २००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या परप्रांतीय उमेदवारांच्या मारहाण प्रकरणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी ठाणे जिल्हा न्यायालयात हजर झाले. तब्बल १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत आज राज ठाकरे यांनी न्यायमूर्तींसमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, हा गुन्हा राजकीय आकसापोटी आणि तत्कालीन सरकारच्या दबावाखाली दाखल करण्यात आल्याचा दावा केला.
न्यायालयीन कामकाजाचा तपशील-
ठाणे जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती अभिजीत व्ही. कुलकर्णी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. हे प्रकरण सुरुवातीला कल्याण न्यायालयात प्रलंबित होते, परंतु नंतर ते ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषणे केल्यामुळेच कार्यकर्त्यांनी परप्रांतीय परीक्षार्थींना मारहाण केली, असा मुख्य आरोप फिर्यादी पक्षाकडून ठेवण्यात आला आहे. आजच्या सुनावणीत राज ठाकरे यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात न उभे राहता थेट न्यायमूर्तींसमोर उभे राहून प्रश्नांची उत्तरे दिली.
न्यायमूर्ती आणि राज ठाकरे यांच्यातील प्रश्नोत्तरांचा गोषवारा-
सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी राज ठाकरे यांना विचारले की, “रघुनाथ शेलार आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षीनुसार २००८ मध्ये परीक्षार्थींना मारहाण करण्यात आली होती, याबाबत काय म्हणाल?” त्यावर राज ठाकरे यांनी आक्रमकपणे “हे सर्व खोटे आहे,” असे उत्तर दिले. पुढे न्यायमूर्तींनी विचारले की, “एका आरोपीच्या झडतीदरम्यान त्याच्याकडे मनसेचे सभासदत्व असल्याचे ओळखपत्र सापडले होते, हे खरे का?” यावर ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “मी त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नव्हतो.”
तपास अधिकारी आणि सीडी पुराव्यावरून दावा-प्रतिदावा-
तपास अधिकारी अरुण जगताप यांनी राज ठाकरेंच्या भाषणांची ‘सीडी’ पुराव्यादाखल मिळवली होती आणि त्यातील चिथावणीखोर भाषेमुळे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाली होती, असे न्यायमूर्तींनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मुळात मी त्या कालावधीत नाशिकमध्ये होतो. तत्कालीन राज्य सरकारच्या दबावाखाली माझ्यावर हा खोटा गुन्हा लादण्यात आला आहे.” या प्रकरणातील पुराव्यांवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
सुमारे १५ ते २० मिनिटे चाललेल्या या सुनावणीत राज ठाकरे यांनी सर्व आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला. जबाबावर स्वाक्षरी केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयाबाहेर पडले. १८ वर्षांनंतरही सुरू असलेल्या या खटल्याच्या निकालानंतरच यातील सत्यता स्पष्ट होणार आहे.











