Nashik Neet Paper Leak : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘NEET’ परीक्षेचा पेपर फुटल्याने आणि त्यानंतर परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. या गंभीर गैरव्यवहाराच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने आज राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात उग्र निदर्शने करण्यात आली. “लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीटसारख्या स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटतोच कसा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलकांनी मोदी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
राजधानीत आंदोलकांचा ‘एनटीए’ कार्यालयावर धडक देण्याचा प्रयत्न-
दिल्लीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) मुख्यालयावर धडक मोर्चा नेला. या ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि चार स्तरांचे बॅरिकेडिंग करून कार्यालय सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांनी हे अडथळे ओलांडून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दिल्लीतील वातावरण या आंदोलनामुळे दिवसभर तापलेले होते.
मुंबई आणि पुण्यात आंदोलनाचा एल्गार-
महाराष्ट्रातही या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ‘सीईटी’ कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. केंद्र सरकार आणि एनटीएच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्यातही महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक ‘गुडलक चौक’ येथे निदर्शने करण्यात आली. “मोदी सरकारचा धिक्कार असो” आणि “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा” अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. पुण्यातही आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत अनेकांना ताब्यात घेतले.
राज्यात ठिकठिकाणी संतापाची लाट-
केवळ मेट्रो शहरांतच नव्हे, तर नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही युवक काँग्रेसने ठिकठिकाणी निदर्शने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. परीक्षेच्या आयोजनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
विद्यार्थी हितासाठी संघर्षाचा इशारा-
युवक काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.











