Prashant Kishor NCP: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकारांची मोठी चर्चा सुरू आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार, अशा बातम्यांनी सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला होता.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले. यापूर्वी राष्ट्रवादीचे काम पाहणारे निलेश अरोरा यांच्यानंतर आता प्रशांत किशोर पक्षाची संपूर्ण रणनीती ठरवणार, असा दावा केला जात होता. मात्र, आता खुद्द पार्थ पवार यांनी समोर येत या सर्व चर्चांमधील सत्य जनतेसमोर आणले आहे.
Prashant Kishor NCP: पार्थ पवारांनी सोशल मीडियावरून केला खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर करून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. प्रशांत किशोर पक्षासाठी काम करणार असल्याचा दावा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला.
प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या भेटीमागचे खरे कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, हे कोणतेही राजकीय नियोजन नसून केवळ एक कौटुंबिक स्नेहभोजन होते. तसेच प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार क्षेत्रातून संन्यास घेऊन आता बरीच वर्षे झाली आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली.
Prashant Kishor NCP: नेमकी काय आहे पार्थ पवारांची पोस्ट?
आपल्या पोस्टमध्ये स्पष्टीकरण देताना पार्थ पवार म्हणाले की, प्रशांत किशोर हे आमचे अतिशय जवळचे स्नेही असून ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. अजितदादांच्या काळापासून आमचे त्यांच्याशी घरगुती आणि घनिष्ठ संबंध राहिले आहेत. काल ते शहरात आले असता, आम्ही त्यांना आमच्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्याचा आनंद मिळाला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांच्या व्यावसायिक कामाच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत मला स्पष्ट करावेसे वाटते की, त्यांनी राजकीय सल्लागार क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे. भविष्यातही त्यांच्या या निर्णयात कोणताही बदल होईल असे वाटत नाही. आम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही पार्थ यांनी नमूद केले.
Prashant Kishor NCP: गुलाबी जॅकेट ते प्रशांत किशोर; काय आहे पार्श्वभूमी?
यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी ‘डिझाईन बॉक्सड्’ या नामांकित कंपनीचे निलेश अरोरा यांनी मुख्य रणनीतीकार म्हणून काम पाहिले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचंड गाजलेली राष्ट्रवादीची ‘गुलाबी जॅकेट’ आणि ‘गुलाबी रंग’ ही संकल्पना अरोरा यांच्याच डोक्यातून आली होती, असे मानले जाते. अरोरा यांच्यानंतर आता थेट प्रशांत किशोर यांचे नाव समोर आल्यामुळे विरोधकांमध्ये आणि राजकीय तज्ज्ञांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, कौटुंबिक भेटीला राजकीय रंग दिला गेल्याचे सांगत पार्थ पवारांनी या संपूर्ण वादावर आणि चर्चांवर कायमचा पडदा टाकला आहे.
हे देखील वाचा – PM Modi Norway Visit: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणारी ‘ती’ परदेशी पत्रकार कोण? सोशल मीडियावर तुफान चर्चा










