NEET Exam Paper Leak : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ (NEET-UG 2026) मधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्याभोवती केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाचा फास आवळला असून, या संपूर्ण कटाचे धागेदोरे आता समोर येऊ लागले आहेत. रविवारी दुपारपासून लातूरमध्ये दाखल झालेले सीबीआयचे पथक सलग दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकून असून, विविध संशयास्पद ठिकाणांहून माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सुनियोजित कट आणि ‘एनटीए’ पॅनलमधील घुसखोरी
सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिवराज मोटेगावकर याने अत्यंत सुनियोजितपणे हा कट रचला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका संच (Paper Setting Panel) तयार करणाऱ्या समितीत मोटेगावकरने आपले निकटवर्तीय पेरले होते. यामध्ये आरसीसीमध्ये कार्यरत असलेला पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची वर्णी जाणीवपूर्वक एनजीएच्या पॅनलवर लावण्यात आली होती, जेणेकरून प्रश्नपत्रिकेतील गोपनीय माहिती बाहेर काढणे सुलभ होईल.
प्रश्नपत्रिका ‘तोंडपाठ’ करून माहितीची चोरी
या कटाचे स्वरूप अत्यंत विस्मयकारक होते. अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांनी रसायनशास्त्राचे (Chemistry) तर मनीषा मांढरे यांनी जीवशास्त्राचे (Biology) प्रश्नपत्रिका संच तयार करतानाच त्यातील प्रश्न अक्षरशः तोंडपाठ केले. परीक्षेपूर्वीच ही माहिती त्यांनी हस्तलिखित स्वरूपात मोटेगावकरपर्यंत पोहोचवली. मोटेगावकरने या प्रश्नांचे पीडीएफ (PDF) फाईल्समध्ये रूपांतर करून ते आपल्या मोबाइलमध्ये जतन केले आणि पुढे मोठ्या आर्थिक मोबदल्यात त्यांची विक्री केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर मोटेगावकरने आपल्या भ्रमणध्वनीतील हा सर्व डेटा हटवला होता; मात्र सीबीआयने तांत्रिक कौशल्याचा वापर करून हा डेटा पुन्हा मिळवला (Recover), ज्यामुळे त्याचे बिंग फुटले.
बड्या डॉक्टरांची आणि क्लासेसची चौकशी
सोमवारी सीबीआयच्या पथकाने दिवसभर उद्योग भवन परिसरातील आरसीसीच्या मुख्य कार्यालयाची झडती घेतली. त्यानंतर सायंकाळी औसा रोडवरील एका नामांकित खासगी रुग्णालयात छापा टाकला. येथे एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. संबंधित डॉक्टरने आपल्या पाल्यासाठी हा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. या चौकशीदरम्यान सीबीआयने काही महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे, मोबाइल डेटा आणि संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
नाशिकपर्यंत तपासाची व्याप्ती
लातूर पाठोपाठ आता नाशिकमधील नामांकित शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसही सीबीआयच्या रडारवर आले आहेत. संशयित शुभम खैरनार याच्या चौकशीतून नाशिकमधील काही मोठ्या शिक्षण समूहांची नावे निष्पन्न झाली आहेत. सीबीआयने या संस्थांना नोटिसा बजावल्या असून, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी उत्तरे पुरवण्यासाठी मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचा संशय असून, येत्या काही दिवसांत नाशिकमध्येही मोठी छापेमारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.










