Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्याचा इटली दौरा आणि तेथील त्यांच्या हालचालींवरून देशांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचा एक गमतीशीर व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात चॉकलेट वाटण्यात मश्गुल आहेत,” अशा शब्दांत गांधींनी मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मोदी-मेलोनी व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री इटलीमध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोम शहरात छायाचित्रे काढली, जी सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. विशेषतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून मेलोनी यांच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी मेलोनी यांना त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली ‘मेलेडी’ चॉकलेट्स भेट देताना दिसत आहेत. या संवादादरम्यान दोन्ही नेते हास्यविनोद करताना पाहायला मिळाले.
राहुल गांधींची ‘एक्स’ (ट्विटर) वरून टीका
या व्हिडिओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “देशाच्या डोक्यावर आर्थिक मंदीचे वादळ घोंघावत असताना आपले पंतप्रधान इटलीत चॉकलेट्स वाटण्यात व्यस्त आहेत. हे कसले नेतृत्व? ही तर केवळ ‘नौटंकी’ आहे. देशातील शेतकरी, तरुण, महिला आणि मजूर दु:खात असताना पंतप्रधान रिल्स बनवण्यात आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवण्यात धन्यता मानत आहेत.” बेरोजगारीच्या वाढत्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून माझी खिल्ली उडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
रायबरेलीच्या सभेत मोदी-शहा यांच्यावर ‘गद्दार’ शब्दांत प्रहार
राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेली येथील सभेत बोलताना आपल्या टीकेची धार अधिक तीव्र केली. ते म्हणाले, “आता अदानी आणि अंबानी या देशाला वाचवू शकत नाहीत. देशाचा शेतकरी आणि तरुणच देशाला तारू शकतो, परंतु सरकारने तुमचे हात बांधून ठेवले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या जाणीवपूर्वक संपवण्यात आल्या आहेत. मोदींनी आता चॉकलेटं वाटण्याऐवजी शेतकऱ्यांना खतपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे.”
संविधानाच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. “नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भारतीय संविधानावर सतत आक्रमण करत आहेत. देशाची संपत्ती निवडक उद्योगपतींच्या घशात घालणे, हे संविधानावरील आक्रमणच आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था यांसारख्या स्वायत्त संस्था नष्ट केल्या जात असून विद्यापीठांच्या कुलगुरूपदी विशिष्ट विचारसरणीच्या माणसांची नियुक्ती केली जात आहे. संविधानावर अशा प्रकारे आघात करणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणतात आणि मी त्यांना गद्दार म्हणायला घाबरत नाही. मी कधीही कोणाची माफी मागणार नाही,” असे धाडसी विधान राहुल गांधी यांनी यावेळी केले.
तेल निर्यातीवरून अंबानींवर निशाणा
यावेळी राहुल गांधी यांनी मुकेश अंबानी यांच्यावरही टीका केली. “अंबानी देशातील तेल बाहेर निर्यात करत आहेत, जे प्रत्यक्षात भारतीय जनतेला मिळायला हवे. हे तेल जनतेला द्या,” अशी मागणी त्यांनी केली.










