Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा कायदेशीर दिलासा देणारा ठरला आहे. २००८ साली गाजलेल्या रेल्वे भरती आंदोलन आणि हिंसाचार प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने आज (२१ मे) राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे अपुरे असल्याचे स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी कथितरीत्या चिथावणीखोर वक्तव्य केले किंवा हिंसाचारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्ष ठोस पुरावे मांडू शकला नाही. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह इतर सात जणांना सर्व आरोपांतून मुक्त केले. “सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे,” असे निरीक्षण न्यायालयाने आपला निकाल देताना नोंदवले.
नेमकं प्रकरण काय होतं?
या प्रकरणाची पाळेमुळे २००८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आहेत. त्यावेळी मुंबई आणि उपनगरांत रेल्वे भरती परीक्षा सुरू होत्या. “स्थानिक मराठी तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या आहेत,” असा पवित्रा घेत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाले होते. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती, परंतु नंतर जामीन मिळाला होता. सुरुवातीला हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता, जो नंतर ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला.
न्यायालयात राज ठाकरेंची भूमिका
मागील सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी आपला जबाब नोंदवताना या गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. “आंदोलनाच्या वेळी मी नाशिकमध्ये होतो आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही,” असे त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले होते. सुरुवातीच्या काळात काही सुनावण्यांना गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही बजावले होते, मात्र नंतर त्यांच्या वकिलांनी अर्ज करून ते रद्द करून घेतले होते.
निकालानंतरची प्रतिक्रिया: “अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी!”
न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचा निर्णय दिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्मितहास्य करत समाधान व्यक्त केले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेचा उल्लेख केला.










