Kasara Local Train : देशातील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे बुधवारी दुपारी रेल्वे प्रशासनाच्या एका तांत्रिक चुकीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेची कसाराहून आलेली एक उपनगरीय लोकल ट्रेन नियोजित फलाटावर न येता, थेट मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ९ वर आली. या अनपेक्षित बदलामुळे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड धावपळ उडाली असून रेल्वेच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही लोकल गाडी मूळ नियोजनानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर येणे अपेक्षित होते. मात्र, मार्ग निश्चितीमध्ये (रूट सेटिंग) झालेल्या चुकीमुळे ही गाडी थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ९ कडे वळवण्यात आली. दुपारी १२.४४ वाजता हीच गाडी ‘सीएसएमटी-टिटवाळा जलद लोकल’ म्हणून परतीच्या प्रवासाला निघणार होती. त्यामुळे टिटवाळ्याकडे जाण्यासाठी शेकडो प्रवासी आधीच प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, लोकल अचानक ९ क्रमांकाच्या फलाटावर आल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळ निर्माण झाला. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले जड सामानासह एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर धावताना दिसले, ज्यामुळे स्थानकावर काही काळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
अधिकच्या माहितीनुसार, ही चूक ‘रूट सेटिंग’ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याकडून झाली असण्याची दाट शक्यता आहे. संबंधित कर्मचाऱ्याने उपनगरीय लोकलला चुकून मेल ट्रेन समजले आणि त्याप्रमाणे सिग्नल यंत्रणा हाताळून तिला फलाट ९ कडे मार्गस्थ केले. या तांत्रिक त्रुटीमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेषतः ऐन गर्दीच्या वेळी अशा प्रकारची चूक होणे हे रेल्वेच्या शिस्तीला साजेसे नसल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
गोंधळ वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने उद्घोषणा यंत्रणेद्वारे प्रवाशांना प्लॅटफॉर्म बदलण्याबाबत सूचना दिल्या. रेल्वे प्रवक्त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रवाशांना माहिती वेळेत पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. तसेच, टिटवाळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली.










