Home / News / Census shock- Bhakri, Wi-Fi questions surprise citizens : भाकरी खाता की चपाती? एसी, वायफाय आहे? नोकरदार किती?जनगणना की आर्थिक सर्व्हे? सरकारी योजना बंद करणार?

Census shock- Bhakri, Wi-Fi questions surprise citizens : भाकरी खाता की चपाती? एसी, वायफाय आहे? नोकरदार किती?जनगणना की आर्थिक सर्व्हे? सरकारी योजना बंद करणार?

Census shock: Bhakri, Wi-Fi questions surprise citizens – देशात 2011 नंतर 15 वर्षांनी जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात आता...

By: Team Navakal
Census shock- Bhakri, Wi-Fi questions surprise citizens
Social + WhatsApp CTA


Census shock: Bhakri, Wi-Fi questions surprise citizens – देशात 2011 नंतर 15 वर्षांनी जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात आता खास नियुक्त कर्मचारी घरोघरी फिरून पहिल्या टप्प्यात घर नोंदणी करत आहेत. मात्र यावेळी ते जे प्रश्न विचारत आहेत ते ऐकून नागरिक चक्रावले आहेत. तुम्ही भाकरी खाता की चपाती? तांदूळ कोणता वापरता? तुमच्या घरात लाद्या कुठल्या आहेत? नोकरदार किती आहेत? मोबाईल डेटा वापरता की वायफाय आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जर जनगणना केली जात आहे तर हे प्रश्न का विचारले जात आहेत असा सवाल आहे. जनगणनेच्या आडून सरकार आर्थिक सर्व्हे करत असून, यावरून निष्कर्ष काढत रेशनसारख्या सरकारी योजना बंद करण्याचा सरकारचा अंतिम मानस आहे, अशी आता चर्चा सुरू झाली आहे.


पूर्वी जनगणनेत केवळ घरातील सदस्यांची संख्या आणि वार्षिक उत्पन्न यांसारख्या माहितीवर भर दिला जात असे. मात्र, 2026 च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत अनेक बारीकसारीक आणि कौटुंबिक जीवनशैलीशी निगडित प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. तुमच्या घरात खोल्यांची संख्या किती आहे? घरात स्वतंत्र शौचालय आणि स्नानगृह आहे का? शौचालयाचा प्रकार कोणता आहे? तुमच्या घरातील सांडपाण्याचा निचरा कुठे होतो? ते पाईपद्वारे सांडपाणी व्यवस्थेशी जोडले आहे का?

सांडपाणी सेप्टिक टँकमध्ये जाते की, उघड्या नाल्यात जाते? घराला टाईल्स लावल्या आहेत का? घराच्या भिंती कशाच्या आहेत? घराचे छप्पर कशाचे आहे? घराला कौले किंवा पत्रा असेल, तर ते संपूर्ण घराला आहे की फक्त बाल्कनीला आहे? तुम्ही तुमचे घर फक्त राहण्यासाठी वापरता की दुकान, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, दवाखाना इत्यादीसाठी त्याचा वापर करता? या घराची स्थिती कशी आहे? घराला किरकोळ दुरुस्तीची गरज आहे, मोठ्या दुरुस्तीची गरज आहे? कुटुंबात किती विवाहित जोडपी राहतात? लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडपी किती आहेत? नोकरी कितीजण करतात? बेरोजगार किती आहेत? असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.


याव्यतिरिक्त यंदाच्या जनगणनेत नागरिकांच्या आहाराच्या सवयी आणि स्वयंपाकाशी संबंधित माहितीही गोळा केली जात आहे. अन्न शिजवण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंधन वापरता? पीएनजी, एलपीजी की चुलीचा वापर करता? प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे धान्य रोजच्या जेवणात वापरता? आहारात चपाती-भात की भाकरी खाता? दररोज किती आहार घेता? घरातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे? पालिकेकडून पाणी येते का? की विहीर, बोरवेल, तलाव, कालवा की नाल्याद्वारे येते? नळ असेल, तर तो घरात आहे की जवळपासच्या परिसरात आहे? हे प्रश्नही विचारण्यात येत आहेत. सरकारी धोरणे ठरवण्यासाठी ही माहिती आवश्यक असते. जनगणनेशी त्याचा काय संबंध आहे?


जनगणनेत सरकारने नागरिकांच्या तांत्रिकतेविषयी माहिती जाणून घेण्यावरही विशेष लक्ष दिले आहे. यासंबंधी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्ये घरात रेडिओ किंवा टीव्ही आहे का? डिश, केबल किंवा इतर कनेक्शन आहे का? कुटुंबातील सदस्य इंटरनेटचा वापर करण्यासाठी वाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करतात की केवळ मोबाईल डेटावर अवलंबून आहेत? संगणक आहे का? कोणत्या प्रकारचा मोबाईल आहे? कुटुंबाकडे किती आणि कोणती वाहने आहेत? यासारखी वैयक्तिक माहितीही गोळा केली जात आहे.


हा जनगणनेचा पहिला टप्पा आहे. प्रशासकीय सोयीसाठी सरकारने कागदी नोंदींची जुनी पद्धत बंद करून डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. यामुळे माहिती संकलन वेगवान होणार आहे. सर्व माहिती एकाच अ‍ॅपमध्ये साठवली जात असल्याने प्रत्येक कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती आता सरकारला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जनगणनेसाठी नेमलेल्या बहुसंख्य कर्मचार्‍यांकडे ओळखपत्रच नसल्याने त्यांनी घरोघर जाऊन असे प्रश्न विचारले की, संशय निर्माण होतो आहे. अनेक निवासी सोसायट्यांमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्याच्या घटनाही घडत आहेत. सरकारने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे.







Web Title:
संबंधित बातम्या