Petrol Diesel : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सध्या इंधन टंचाईचे अत्यंत भीषण संकट ओढवले असून, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतीची मशागत करण्याचे दिवस असतानाच डिझेलचा साठा संपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वाशिम, बुलढाणा, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असून, डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः रात्रभर पेट्रोल पंपावर मुक्काम करावा लागत आहे.
बुलढाणा आणि वाशिममध्ये परिस्थिती गंभीर
वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी डिझेलचा तुटवडा जाणवत असून, शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच ट्रॅक्टरसह पंपावर रांगा लावल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात हे संकट अकरा दिवसांपासून कायम आहे. मे महिन्यात शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने डिझेलची मागणी २५ टक्क्यांनी वाढली आहे, मात्र पुरवठा त्या तुलनेत अत्यल्प असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित कोलमडले आहे. अनेक ठिकाणी डिझेलच्या रांगेवरून वाद उफाळून येत असून, काही ठिकाणी तलवारी आणि कोयते निघाल्याच्या धक्कादायक घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील पंपावर शेतकरी पहाटेच्या आशेने रात्रभर ट्रॅक्टरमध्येच झोपत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जालन्यात ५९ पंप बंद, तर हिंगोलीत हाणामारी
जालना जिल्ह्यात परिस्थिती अधिकच बिकट असून, इंधनाअभावी तब्बल ५९ पेट्रोल पंप बंद पडले आहेत. यामध्ये सर्वाधिक २४ पंप जालना तालुक्यातील आहेत. इंधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी होणारी अलोट गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आरटी येथील एका पंपावर डिझेलच्या रांगेवरून शेतकऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली, ज्यामध्ये काही शेतकरी जखमी झाले आहेत. हिंगोली शहरात पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावरही मध्यरात्रीनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शासनाकडे महिनाभराचा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष मात्र नागरिकांची होत असलेली फरफट संतापजनक आहे.
शेतीला मोठा फटका: कापूस लागवड खोळंबली
जळगाव जिल्ह्यात इंधन टंचाईचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर होताना दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारी पूर्व हंगामी कापूस लागवड डिझेलअभावी रखडली आहे. जमिनीची मशागत पूर्ण होऊ न शकल्याने हजारो हेक्टर क्षेत्र अद्याप पडून आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कापूस लागवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
न्यायालयीन कामकाजावर परिणाम आणि राजकीय संताप
इंधन तुटवड्याची दखल घेत नागपूर जिल्हा न्यायालय प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंधन बचतीसाठी आणि देशहितासाठी वकिलांना व पक्षकारांना ‘योग्य वापर’ करण्याचे आवाहन करत, अत्यावश्यक असल्याशिवाय कोर्टात न येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. साक्ष नोंदणी आणि नवीन प्रकरणांसाठी ऑनलाइन सुनावणीला प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर कडाडून टीका केली आहे. “सप्लाय चेन” मधील बिघाडामुळे ही परिस्थिती ओढवली असून, १५-१५ तास रांगेत थांबूनही शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरवाढीचा तिहेरी फटका
पुरवठा कमी असतानाच किमतीत होणारी सततची वाढ आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. अवघ्या आठ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी तिसऱ्यांदा दरवाढ केली आहे. १५ आणि २० मे नंतर आता पुन्हा पेट्रोल ८७ पैसे आणि डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०८.४५ रुपयांवर, तर डिझेल ९५.०२ रुपयांवर पोहोचले आहे.









