Devendra Fadnavis : गेल्या आठ दिवसांत देशभरात सलग तीनवेळा झालेल्या इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात इंधन तुटवड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. भविष्यात दर अधिक वाढतील किंवा पुरवठा खंडित होईल या भीतीने नागरिकांनी बाटल्या आणि कॅनमध्ये इंधन साठवण्यास सुरुवात केल्यामुळे मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी रात्रभर रांगा लावूनही इंधन मिळत नसल्याचे चित्र आहे.
बळीराजाची कोंडी आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश
पावसाळा उंबरठ्यावर असताना शेतीच्या मशागतीसाठी आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना डिझेलची नितांत गरज आहे. मात्र, टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत. “शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आवश्यक असणारे डिझेल प्राधान्याने आणि वेळेत उपलब्ध करून द्यावे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी,” असे त्यांनी निर्देशित केले. काही जिल्ह्यांमध्ये वाहनांचे ‘आरसी बुक’ तपासून डिझेल देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
साठेबाजीवर कडक नजर; पुरवठ्यातील विसंगती
इंधनाची मागणी अचानक २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी साठेबाजीबाबत शंका व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी अवैध साठा करत असेल, तर त्यांच्यावर कडक पाळत ठेवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मागणीतील ही अनपेक्षित वाढ पुरवठा साखळीत अडथळे निर्माण करत असून, गोंधळ घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
परभणीत १० टक्के इंधन राखीव ठेवण्याचे निर्देश
परभणी जिल्ह्यात डिझेलची मागणी दीडपटीने वाढल्याने जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी साठेबाजांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असला तरी भीतीपोटी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी एकूण साठ्यापैकी १० टक्के इंधन राखीव ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
वाहतूक क्षेत्राला फटका आणि आंदोलनाचा इशारा
इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका वाहतूक (ट्रान्सपोर्ट) व्यवसायाला बसला आहे. धुळे येथील ट्रान्सपोर्ट संघटनेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनुसार, डिझेल उपलब्ध नसल्यामुळे परराज्यात जाणारी वाहने अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी अडकून पडली आहेत. यामुळे वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून वाहनांचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.










