Education Minister Dharmendra Pradhan : सीबीएसई आणि नीट युजी-2026 परीक्षांमध्ये घातलेल्या प्रचंड गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आणखी काही कारनामे उघड झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेताना ज्या बंगल्यात रहात होती तो बंगला ओडिशामधील एका शिक्षण संस्थेच्या मालकीचा आहे आणि प्रधान यांच्या पत्नीचा त्या संस्थेशी थेट संबंध आहे. त्यामुळे हा बंगला प्रधान यांच्याच मालकीचा आहे असा संशय व्यक्त होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रधान यांच्या मुलीची अमेरिकेत सर्व व्यवस्था सीबीएसई परीक्षेत गोंधळ घालणार्या कोएम्पट या कंपनीच्या संचालकाने केली होती, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळेच शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीने अधिक जोर धरला आहे.
कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या शनिवारी 6 जून रोजी सकाळी 8 वाजता नवी दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यानंतर ते लडाखचे पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासोबत दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणार आहेत, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी दिली. या आंदोलना संदर्भात नवी दिल्ली कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या आंदोलनात एक मोठा नेताही पक्षात प्रवेश करणार आहे.
प्रधान यांची मुलगी अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेत असताना ज्या बंगल्यात वास्तव्याला होती तो बंगला विकास एज्युकेशन ट्रस्ट नावाच्या शैक्षणिक संस्थेच्या मालकीचा आहे. या संस्थेशी प्रधान यांच्या पत्नीचा थेट संबंध आहे, तर सीबीएसई परीक्षेच्या मूल्यांकनाचे कंत्राट प्रधान यांनी ज्या ‘कोएम्प्ट एडू टेक’ या कंपनीला दिले होते त्या कंपनीचे संचालक राधाकृष्णन जयरामन यांनीच प्रधान यांच्या मुलीची अमेरिकेत सर्व व्यवस्था पाहिली होती. याच कोएम्प्ट एडु टेक कंपनीने सीबीएसई परीक्षेच्या मूल्यांकनात गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. ओडिशातील विरोधी पक्ष बिजू जनता दलाने हा मुद्दा उचलून धरला असून विकास फाउंडेशन ट्रस्टशी त्यांच्या पत्नीचे नाव जोडले गेल्याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर विकास फाउंडेशनबाबत नवनवी माहिती समोर येत आहे.
या संस्थेवर अनेक आरोप केले जात आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पत्नीचे नाव या संस्थेशी जोडले जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे. त्यामुळे प्रधान यांनी याबाबत सत्य काय आहे ते जनतेसमोर मांडले पाहिजे, अशी मागणी बीजेडीच्या नेत्या राज्यसभेतील खासदार सुलता राव आणि पक्षाचे प्रवक्ते लेनिन मोहंती यांनी पत्रकार परिषदेत केली.
सीबीएसई आणि नीट परीक्षांमधील या गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला असून प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. याच मुद्यावर सरकारला घेरण्याचा कॉकरोच पार्टीचा (सीजेपीचा) प्रयत्न आहे. केवळ व्यवस्थेवर व्यंगात्मक भाष्य करण्यासाठी सोशल मीडियावर जन्मलेल्या सीजेपीने अवघ्या महिन्याभरात राजकीय पक्षाचे रुप धारण केले आहे.स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बड्या कलावंतांनी पाठिंबा दर्शवलेल्या सीजेपीचे दोन कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. 6 जूनचे आंदोलन अत्यंत नियोजनबद्ध रितीने करण्याचे सीजेपीने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीजेपीने तीन प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. शोध पत्रकार सौरव दास हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते असणार आहेत. तर राजकीय विश्लेषक,लेखक आणि चित्रपट निर्मात्या विजेता दहिया आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकीय सल्लागार संस्था मॅककिनसेचे आशुतोष रांका यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे तिनही प्रवक्ते उच्चशिक्षित आणि आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.
प्रधान यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षांमध्ये झालेले गोंधळ गंभीर स्वरुपाचे आहेत. एनटीएने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या नीट यूजी 2026 परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.सीबीएसई बारावीच्या निकालादरम्यान ऑनस्क्रिन मार्किंग (ओएसएम) प्रणालीच्या वापरामुळे गुणदान प्रक्रियेत आणि उत्तरपत्रिका तपासणीत मोठ्या त्रुटी आढळल्या. हजारो विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळणे किंवा तांत्रिक कारणांमुळे गुण न दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले. सीबीएसईने यावर्षी इयत्ता 12 वीच्या परीक्षांसाठी ऑनस्क्रीन मार्किंग पद्धत लागू करण्यात आली होती. ज्यामध्ये छापील उत्तरपत्रिकांऐवजी स्कॅन केलेल्या डिजिटल प्रतिंचे मूल्यमापन केले गेले. मात्र कोएम्पट एडु टेक कंपनीला ही मूल्यमापन पद्धती योग्यरित्या वापरता आली नाही.उत्तर पत्रिका तपासण्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे गुणदानातही चुका झाल्या. या कंपनीच्या भूतकाळातील वादग्रस्त कारभारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रधान यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एका पाठोपाठ एक घडणार्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संतप्त झालेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि युवक काँग्रेसच्या वतीने दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूरसह विविध शहरांमध्ये प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत युवा आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. परीक्षांमधील या गोंधळानंतर मूल्यमापन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत घेऊन पोर्टल दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रधान यांनी दिले आहे. भविष्यात परीक्षांमध्ये असा गोंधळ होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रियेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवतील, असे अफलातून उत्तर सरकारने कोर्टात दिले आहे.
कारवाईच्या नावाखाली डिजिटल मूल्यमापन पद्धतीतील अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर वादग्रस्त ठरलेले सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी 2001 च्या बॅचचे आयएएस अधिकार प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव हिमांशु गुप्ता यांना मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले.मात्र ज्यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्या धर्मेंद्र प्रधान यांना सरकार का पाठीशी घालत आहे,असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दरम्यान, सीबीएसईच्या ऑन स्क्रिन मार्किंग पद्धतीतील गोंधळ सर्वप्रथम बाहेर काढणारा 17 वर्षीय विद्यार्थी सार्थक सिध्दांत याने राहुल गांधी यांची भेट घेतली. सिद्धांतने काल ससंदीय स्थायी समितीसमोर आपली साक्ष नोंदवली.त्यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांची भेट घेतली. आपल्या तत्वांवर ठाम रहा, असा सल्ला सार्थकला राहुल गांधी यांनी दिला.
सीजेपीचे घोषणापत्र
सीजेपीने फक्त पाच मुद्यांवर भर देत आपले घोषणापत्र जाहीर केले. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभेची खासदारकी दिली जाणार नाही. मतदार यादीतून एका जरी वैध मतदाराचे नाव वगळल्याचे आढळून आल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना बेकायदेशीर कायदे प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली जाईल. संसदेच्या जागा न वाढवता महिलांना 50 टक्के आरक्षण देणे, अदानी आणि अंबानींच्या मालकीच्या वाहिन्यांचे परवाने रद्द करणे आणि गोदी मीडियाची सर्व बँक खाती तपासणे आणि पक्षात बंडखोरी करून दुसर्या पक्षात प्रवेश करणार्या नेत्यावर 20 वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यास मनाई करणे हे पाच मुद्दे सीजेपीच्या घोषणापत्रामध्ये आहेत.
नीटची कोरी उत्तरपत्रिका
20 लाखांत भरून देणारे एजंट
नीट परीक्षेतील एक अतिशय धक्कादायक आणि नवा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पेपर फुटी प्रकरणानंतर आता नीट पुनर्परिक्षेबाबत या नव्या रॅकेटमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला आहे. नीटची मार्किंगची उत्तरपत्रिका अर्थात ओएमआर शीट कोरी ठेवायची आणि नंतर 20 लाख रुपयांमध्ये ती भरून दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या धक्कादायक माहितीनुसार मध्यस्थाने एका विद्यार्थ्याशी संपर्क साधला. पेपर फोडण्याऐवजी थेट उत्तरपत्रिकाच मॅनेज करणार असल्याचे त्याने म्हटले. या रॅकेटचा पर्दाफाश अहमदाबादमधील शुभम ठक्कर नावाच्या विद्यार्थ्याने केला आहे. शुभमने 2023 आणि 2024 मध्ये स्वतः नीट परीक्षा दिली होती. मध्यस्थांसोबत झालेले त्याचे संभाषण त्याने स्वतः रेकॉर्ड केले आणि या संपूर्ण प्रकरणाची गुजरात सायबर सेलकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सायबर सेल आता या ऑडिओ क्लिप आणि तक्रारीच्या आधारे देशातील या मोठ्या रॅकेटचा तपास करत आहे. विद्यार्थ्यांना त्यांची मुख्य उत्तरपत्रिका म्हणजेच ओएमआर शीट परीक्षेत कोरीच ठेवण्यास सांगितले जाते. तुम्ही फक्त तुमचे परीक्षा केंद्र आणि नंबर सांगा, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक आणि इतर कर्मचार्यांना आम्ही पैशांच्या जोरावर मॅनेज करू. परीक्षा संपल्यानंतर आमची माणसे त्या कोर्या ओएमआर शीटवर अचूक उत्तरे शाईने भरून ती पुढे पाठवतील, असा दावा मध्यस्थांच्या टोळीकडून केला जात आहे. तपास यंत्रणांना किंवा कोणालाही संशय येऊ नये, म्हणून हे रॅकेट विद्यार्थ्यांना पैशांच्या बदल्यात टॉपर बनवत नाही. त्याऐवजी, विद्यार्थ्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हमखास प्रवेश मिळेल, इतकेच मर्यादित गुण ओएमआर शीटमध्ये भरले जातात. या संपूर्ण करामतीसाठी प्रति विद्यार्थी तब्बल 20 लाख रुपयांचा दर ठरवला जातो.









