Rain : राज्यातील विविध भागांत आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण, पनवेल, कोकण, पुणे, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा आणि अहिल्यानगरसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले.
मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, लोअर परळ, दहिसर, मालाड, मुलुंड, सायन आणि चेंबूर परिसरात सकाळी पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अंधेरी सबवे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने टीका होत आहे. सबवे परिसरात काढून ठेवलेल्या गाळामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने सकाळी 7.40 वाजता खबरदारीचा उपाय म्हणून सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) रस्ता निसरडा झाल्याने बस आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार सकाळी 7 ते 8 या एका तासात पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी 9.84 मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईत 0.96 मिमी तर पूर्व उपनगरांत 1.25 मिमी पाऊस झाला. वसई-विरार शहरातही गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पालघरमध्ये पावसामुळे तासभर वीजपुरवठा खंडीत झाला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडला असून हवामान विभागाने 6 जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक भागांत तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गडावरील पायर्यांना धबधब्याचे स्वरूप आले होते.

सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. कोल्हापूर, जयसिंगपूर आणि शिरोळ परिसरात सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही घरांवरील पत्रे उडून गेली. जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात मुसळधार पाऊस झाला. आठवडे बाजारात पाणी साचल्याने व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. बुलडाणा येथे पावसाने केळीचे नुकसान झाले.









