FIFA World Cup 2026: भारतातील लाखो फुटबॉल चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी फिफा वर्ल्ड कप 2026 चे थेट प्रक्षेपण भारतात कुठे होणार, याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ आणि अनिश्चितता आता अधिकृतपणे संपली आहे.
भारतीय मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘झी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघासोबत (FIFA) एक ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार, आगामी 2026 च्या विश्वचषकासह 2034 पर्यंतच्या सर्व मोठ्या फिफा स्पर्धांचे प्रक्षेपण हक्क झी नेटवर्कने मिळवले आहेत. यामध्ये फिफा महिला विश्वचषक 2027 आणि फिफा विश्वचषक 2030 चा देखील समावेश आहे. यंदाच्या महाकुंभात एकूण 48 संघ सहभागी होणार असून त्यांच्यात 104 थरारक सामने रंगणार आहेत.
मोबाईल आणि लॅपटॉपवर येथे पाहा ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’
डिजिटल माध्यमांवर फुटबॉल सामन्यांचा आनंद घेणाऱ्या चाहत्यांसाठी कंपनीने आपली ऑनलाईन यंत्रणा सज्ज केली आहे:
- ओटीटी प्लॅटफॉर्म: फिफा वर्ल्ड कप 2026 चे सर्व सामने ‘झी5’ (Zee5) या ॲपवर थेट दाखवले जाणार आहेत.
- कधी सुरू होणार सोहळा: या जागतिक स्पर्धेचा पहिला उद्घाटनाचा सामना 11 जून रोजी मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल. तर या महाकुंभाचा अंतिम सामना 19 जुलै रोजी रंगणार आहे.
- विविध उपकरणांवर उपलब्धता: युझर्स आपल्या मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर या ॲपच्या माध्यमातून सामन्यांचा थेट आनंद घेऊ शकतात.
टीव्ही प्रेक्षकांसाठी नवीन स्पोर्ट्स चॅनेल्स सुरू
घरात टीव्हीवर आरामात फुटबॉल मॅच पाहणे पसंत करणाऱ्या मोठ्या वर्गासाठी देखील झी नेटवर्कने विशेष तयारी केली आहे. यासाठी कंपनीने आपली नवीन ‘युनिट8 स्पोर्ट्स नेटवर्क’ (Unit8 Sports Network) ही चॅनेल मालिका बाजारात आणली आहे. प्रेक्षकांना खालील वाहिन्यांवर हे सामने पाहता येतील:
- युनिट8 स्पोर्ट्स 1
- युनिट8 स्पोर्ट्स 1 एचडी
- युनिट8 स्पोर्ट्स 2
- युनिट8 स्पोर्ट्स 2 एचडी
भारतीय वेळेनुसार (IST) सामन्यांची वेळ काय असेल?
ही संपूर्ण स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये आयोजित केली जात असल्याने वेळेतील फरकामुळे चाहत्यांना थोडी कसरत करावी लागणार आहे. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) प्रक्षेपित केले जातील.
तिथल्या वेळेनुसार काही सामने भारतीय वेळेनुसार उशिरा संध्याकाळी सुरू होतील, तर बहुतांश महत्त्वाचे सामने पहाटे आणि सकाळी पाहावे लागतील. सामन्यांसाठी प्रामुख्याने रात्री 12:30, पहाटे 3:30, सकाळी 6:30 आणि सकाळी 9:30 अशा भारतीय वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा – Shreyas Iyer Captaincy: “मी कोणाच्याही सावलीत राहणार नाही”; भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरचा थेट इशारा










