ODI World Cup 2027: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत (ODI World Cup) एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०२७ मध्ये होणारा पुरुष वन-डे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर २०२७ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसीच्या (ICC) बोर्ड बैठकीत या तारखांवर प्राथमिक शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या वेळापत्रकाचा अंतिम आणि सविस्तर मसुदा जुलै महिन्यात एडिनबर्ग येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मंजूर केला जाईल. २००३ नंतर पहिल्यांदाच आफ्रिका खंडात वन-डे विश्वचषकाचे पुनरागमन होत आहे.
ODI World Cup 2027: कोणत्या देशात किती सामने होणार?
या विश्वचषकात एकूण 54 सामने खेळवले जाणार असून, त्यांचे नियोजन तिन्ही देशांमध्ये खालीलप्रमाणे विभागले जाण्याची शक्यता आहे:
- दक्षिण आफ्रिका: या स्पर्धेतील सिंहाचा वाटा दक्षिण आफ्रिकेकडे असेल. येथील 8 स्टेडियमवर किमान 41 सामने खेळवले जातील.
- झिम्बाब्वे: येथे 8 ते 10 सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
- नामिबिया: या नवख्या देशाला केवळ 3 सामन्यांचे यजमानपद मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने आपल्या स्टेडियमची संख्या २ वरून ३ केली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब आणि बुलावायो येथील क्वीन्स क्लब व्यतिरिक्त आता ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ हे नवीन केंद्र जोडले गेले आहे. येथील नवीन स्टेडियम या वर्षाच्या अखेरीस तयार होईल.
ODI World Cup 2027: १० नव्हे तर आता १४ संघ भिडणार; स्पर्धेचे नवीन स्वरूप
गेल्या दोन विश्वचषकांमध्ये केवळ १० संघ सहभागी झाले होते, परंतु २०२७ मध्ये आयसीसी पुन्हा जुन्या स्वरूपात स्पर्धा खेळवणार आहे. आता एकूण १४ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील.
येथील सामन्यांची रचना खालीलप्रमाणे असेल:
- सर्व १४ संघांची ७-७ च्या दोन गटात (Group) विभागणी केली जाईल.
- दोन्ही गटातील अव्वल ३-३ संघ पुढील ‘सुपर सिक्स’ (Super Six) फेरीत प्रवेश करतील.
- पूर्ण सदस्यत्वामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे थेट पात्र ठरले आहेत, तर नामिबियाला पात्रता फेरी पार करावी लागेल.
ODI World Cup 2027: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विस्तार होणार?
हा विश्वचषक २०२७ ते २०३१ या नवीन ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’चा (FTP) भाग असेल. या नवीन चक्राला अंतिम रूप देण्यासाठी हाँगकाँग येथे आयसीसीची बैठक होणार आहे. या नवीन रचनेत सर्वात मोठा अडथळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) विस्ताराचा आहे.
सध्या झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान हे देश कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाहीत. आता आयसीसी सर्व १२ देशांना यामध्ये समाविष्ट करणार का, आणि १ सामन्याच्या कसोटी मालिकेचा यात समावेश करायचा का, यावर जुलै महिन्यात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.










