Home / देश-विदेश / NCP Merge into Congress : नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना अन् विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण; राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या प्रतिक्रियेत नक्की काय म्हटलं?

NCP Merge into Congress : नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना अन् विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण; राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या प्रतिक्रियेत नक्की काय म्हटलं?

NCP Merge into Congress : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेस पक्षातील संभाव्य विलीनीकरणाबाबत जोरदार...

By: Team Navakal
NCP Merge into Congress
Social + WhatsApp CTA

NCP Merge into Congress : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेस पक्षातील संभाव्य विलीनीकरणाबाबत जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलीनीकरणासंदर्भातील कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडूनही आमच्याकडे असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती शिंदे यांनी दिली. जर असा कोणताही प्रस्ताव आला असता, तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला निश्चितपणे त्याबाबत अवगत करण्यात आले असते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

पक्षाच्या अंतर्गत बैठकीत चर्चा नाही-
नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्येसुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात पसरलेल्या या बातम्यांमध्ये सध्यातरी कोणतेही तथ्य नसल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

डाव्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकीची गरज-
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या विलीनीकरणाच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनीही पक्षाची भूमिका मांडली. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वच समविचारी व डाव्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही, असे काकडे म्हणाले. परंतु, काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे, या चर्चेत तथ्य नाही. भविष्यात जर असा प्रस्ताव आला, तर पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर नक्कीच विचारविनिमय करतील. अलीकडच्या काळातील दोन-तीन विधानसभा निवडणुकांमधील अनुभवांमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना राजकीय प्रगल्भता आली आहे. मग ते राहुल गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत वा अन्य कोणतेही नेते; हे सर्वच नेते आता राजकीयदृष्ट्या तावून-सुलाखून निघाले आहेत. सद्यस्थितीत देशातील संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन काकडे यांनी केले.

नाना पटोले यांचा वेगळा दावा; दिल्लीला रवाना
दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमंडने तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी एक महत्त्वपूर्ण आणि वेगळा दावा केला. पटोले यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव स्वतः शरद पवार यांनी यापूर्वीच दिला होता, मात्र काही कारणास्तव त्यावर अंतिम निर्णय घेण्यास विलंब झाला.

सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि संवैधानिक व्यवस्थेला बसणारे तडे पाहता, धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) मतांचे विभाजन रोखणे अत्यंत गरजेचे आहे. देश आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एका छत्राखाली यावे, यासाठीची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे, असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या