Savitribai Jyotirao Phule Serial Offair : टेलिव्हिजन विश्वात अत्यंत आदराने आणि उत्सुकतेने पाहिली जाणारी ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही ऐतिहासिक मालिका टीआरपीचे (TRP) कारण देत तडकाफडकी बंद करण्यात आल्याने क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ही मालिका सुरू ठेवण्यासाठी वाहिनी स्तरावर शर्थीचे प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मालिका कशा प्रकारे बंद पाडली जात आहे, याबद्दल उद्विग्नता व्यक्त करत तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यानंतर या विषयाला सामाजिक आणि राजकीय वळण मिळाले. मात्र, संबंधित वाहिनीने निव्वळ व्यावसायिक गणितांचा दाखला देत या मालिकेचे प्रक्षेपण थांबवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर, मालिका बंद होण्यामागची नेमकी कारणमीमांसा करणारा एक सविस्तर व्हिडिओ डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेचा शेवटचा भाग १४ जून रोजी प्रसारित झाला असून, ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ५ जानेवारी रोजी सुरू झालेला हा प्रवास इतक्या लवकर संपणार असल्याची बातमी जशी बाहेर आली, तसे असंख्य चाहत्यांचे फोन, संदेश आणि ईमेल आले. महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचत राहावा, यासाठी अनेकांनी ही मालिका बंद न करण्याची विनंती केली. पंढरपूरमध्ये एका तरुणाने कडक उन्हात या विरोधात आंदोलन केले, तर इंदापूरमधील निमगाव केतकी येथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. बार्शी तालुक्यातही विविध स्तरांवरून प्रयत्न झाले. आजच्या आधुनिक काळातही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समजून घेणे व ते पचवणे ही अवघड गोष्ट आहे. ते व्यवस्थेविरोधात बंड करणारे सामाजिक क्रांतिकारक होते, त्यामुळे त्यांना त्या काळातही विरोधाचा सामना करावा लागला होता आणि म्हणूनच सावित्रीबाईंना शाळा सुरू करताना अतोनात छळ सोसावा लागला.”
वाहिनीचे आभार आणि कॉर्पोरेट संस्कृतीवर भाष्य-
मालिका बंद झाली असली तरी डॉ. अमोल कोल्हे यांनी कोणत्याही प्रकारचा आकस किंवा रोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीचे, विशेषतः सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर आणि कार्यकारी निर्माते अभिजीत खाडे यांचे मनापासून आभार मानले आहेत. आजच्या काळात जेव्हा सासू-सुनांच्या कौटुंबिक मालिकांचा बोलबाला आहे, अशा वातावरणात वाहिनीने किमान १५२ भागांपर्यंत का होईना, पण हा पुरोगामी इतिहास सांगण्याचे धाडस दाखवले आणि वेळोवेळी सहकार्य केले, हे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले. तथापि, महाराष्ट्राच्या या अस्मितेशी जोडलेल्या प्रेक्षकांच्या भावना आणि कॉर्पोरेट संस्कृतीची व्यावसायिक गणिते यांची सांगड बसू शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वाहिनीच्या मालकीची ही मालिका असल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी, ऐतिहासिक मूल्य किंवा डबिंगचे पर्याय या गोष्टींचा सखोल विचार न करता निव्वळ नफा-तोटा हाच निकष लावला, ज्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदतीचा ओघ आणि पुढील दिशा
या मालिकेची आर्थिक अडचण आणि निर्मितीमूल्यांचा प्रश्न समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी या ऐतिहासिक कार्याला पाठबळ देण्याचे जाहीर केले. अमोल कोल्हे यांच्या आवाहनानंतर आमदार रोहित पवार यांनी या मालिकेसाठी ५० लाख रुपयांची, तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १० लाख रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. याशिवाय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही या कठीण प्रसंगात सहकार्याचा हात पुढे केला. या सर्व नेत्यांचे डॉ. कोल्हे यांनी विशेष आभार मानले आहेत.










