Telegram Ban : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG 2026) च्या आगामी फेरपरीक्षेच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत कठोर आणि अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. देशातील नामांकित वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही फेरपरीक्षा येत्या २१ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि संपूर्ण निष्पक्षतेने पार पाडावी, यासाठी सरकारने लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘टेलीग्राम’वर (Telegram) तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी २२ जूनपर्यंत लागू राहणार असून, या ॲपमधील ‘मेसेज एडिट’ (संदेश सुधारणा) हे वैशिष्ट्यपूर्ण फीचर ३० जूनपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रश्नपत्रिका फुटीच्या खोट्या दाव्यांना आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पाऊल
राष्ट्रीअधिकच्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि विशेषतः टेलिग्राम चॅनेल्सचा गैरवापर करून काही समाजकंटक आणि फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. हे गट “Paper Leaked NEET”, “Re-NEET 2026” आणि “Private Mafia” यांसारख्या संशयास्पद नावांनी टेलिग्रामवर चॅनेल्स चालवत होते. या चॅनेल्सच्या माध्यमातून निष्पाप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आगाऊ उपलब्ध करून देण्याचे खोटे आमिष दाखवले जात होते आणि त्याबदल्यात हजारो ते लाखो रुपयांची बेकायदेशीर मागणी केली जात होती.
या संदर्भात ‘एनटीए’ने (NTA) अत्यंत स्पष्ट शब्दांत खुलासा केला असून, नीट परीक्षेची मुख्य प्रश्नपत्रिका पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय आहे आणि ती सध्या कोणाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अपप्रचाराला किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे.
टेलिग्रामच्या ‘मेसेज एडिट’ फीचरचा गैरवापर
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामच्या ‘मेसेज एडिट’ या सुविधेचा अत्यंत पद्धतशीर आणि चुकीच्या मार्गाने वापर करण्यात आला. सायबर गुन्हेगार आणि पेपर लीक करणाऱ्या टोळ्या परीक्षा संपल्यानंतर जुन्याच मेसेजमध्ये फेरबदल (Edit) करत असत. परीक्षा संपल्यावर मूळ प्रश्नपत्रिका हाती येताच, ती जुन्या वेळेच्या मेसेजमध्ये समाविष्ट केली जायची. यामुळे सामान्य लोकांना आणि विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर लीक झाला होता, असा संभ्रम निर्माण होत असे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रचला जाणारा हा खोटा बनाव रोखण्यासाठी आणि अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठीच सरकारने थेट टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
एनडीएकडून (NTA) सर्वसामान्य नागरिकांची क्षमाप्रार्थना
NTA चे अधिकृत प्रसिद्धीपत्रक: “देशभरातील लाखो नागरिक, तरुण आणि व्यावसायिक हे शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि वैयक्तिक संवादासाठी दैनंदिन जीवनात टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. या तात्पुरत्या बंदीमुळे सर्वसामान्य युजर्सना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागलेल्या ‘नीट-युजी २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची विश्वासार्हता आणि पवित्रता जपण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत अनिवार्य होते.” हा निर्णय केवळ मर्यादित कालावधीसाठीच घेण्यात आला असून, २१ जूनची मुख्य फेरपरीक्षा सुरक्षित आणि चोख वातावरणात पार पडल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२१ जूनच्या नीट परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी सरकार अॅक्शन मोडमध्ये









