Samajwadi Party Split: देशातील विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना लागलेली गळती थांबताना दिसत नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत बंडखोरीची चर्चा ताजी असतानाच, आता उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (सपा) मोठी फूट पडणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी केला आहे.
राजभर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक सूचक पोस्ट लिहीत ‘सपा’मधील अनेक मोठे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशसह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पोहोचले गोपनीय पत्र?
ओपी राजभर यांनी अखिलेश यादव यांच्या पक्षातील अंतर्गत धुसफुशीवर बोट ठेवताना गंभीर आरोप केले आहेत:
- अमित शाह यांना पत्र: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र सुपूर्द केले असल्याचा दावा राजभर यांनी केला आहे.
- घोटाळ्यांची टांगती तलवार: उत्तर प्रदेशातील बहुचर्चित खाण घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. आता या प्रकरणांमध्ये चौकशीचा फास आवळला जात असल्याने समाजवादी पक्षाचे नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
- भाजप प्रवेशाची तयारी: राजभर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र आणि बंगाल विसरा, इथे तर संपूर्ण समाजवादी पक्षच भाजपमध्ये सामील होण्यासाठी तयार बसला आहे.”
अखिलेश यादव आणि ‘सपा’चा पलटवार; “गाणे आणि दाणे कधीपर्यंत चालणार?”
ओपी राजभर यांच्या या दाव्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडाडून टीका केली आहे. भाजपने यापूर्वीही अनेक पक्ष फोडले असून आमच्या आमदारांना आणि विधान परिषद सदस्यांना आमिषे दाखवून खेचले असल्याचा आरोप त्यांनी केला. राजभर यांच्या विधानाचा समाचार घेताना अखिलेश यादव मिश्किलपणे म्हणाले, “त्यांचे हे ‘दाणे आणि गाणे’ (फायदे आणि कौतुक) चे अफ़साने कधीपर्यंत चालणार आहेत?”
दुसरीकडे, पक्षाचे प्रवक्ते मनीष सिंग यांनी राजभर यांना स्वतःची ताकद ओळखण्याचा सल्ला दिला आहे. “तुमच्या संपूर्ण पक्षात जेवढे कार्यकर्ते आणि नेते आहेत, तेवढे आमच्या पक्षाच्या एका ब्लॉकमध्ये आहेत. त्यामुळे आमच्यावर बोलण्यापूर्वी स्वतःची राजकीय लायकी तपासा,” असे सिंग यांनी सुनावले.
बंगाल आणि महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षांसमोर मोठे संकट
सध्या देशाती प्रमुख राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे:
- पश्चिम बंगाल (TMC संकट): नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. विधानसभेतील 58 आमदारांनी अधिकृत नेतृत्वाला आव्हान दिले असून हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. दुसरीकडे, खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली 20 खासदारांनी बंडखोरी करत लोकसभेत एनडीएला पाठिंबा दिला आहे. हे सर्व २० खासदार नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (NCPI) विलीन होण्याची तयारी करत आहेत.
- महाराष्ट्र (शिवसेना ‘ऑपरेशन टायगर’): महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार बंडखोरीच्या तयारीत असून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची मागणी करणार आहेत.
हे देखील वाचा – US Iran Peace Agreement: तिसरे महायुद्ध टळले! ट्रम्प अन् इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी करारावर केली सही; 60 दिवसांचा ‘हा’ नियम लागू










