Uddhav Thackeray : उबाठाचे सहा खासदार फुटण्याच्या पार्श्वभूमीवर माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आज शिवसेनेच्या 60वा वर्धापन दिन साजरा करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. ते म्हणाले की, शिवसैनिकांनो, माझ्यावरील सर्व आरोप खरे असतील, असे तुम्हाला वाटत असेल तर मी आता पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मात्र माझी एकच अट आहे की, माझी सोन्यासारखी शिवसेना दरोडेखोर आणि चोरांच्या हातात गेली नाही पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जी गद्दारी झाली आहे. मी त्या त्या वार्डातील तमाम मतदारांची जाहीर माफी मागतो. कारण त्या सर्व मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना माझ्यावर आणि बाळासाहेबांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. आम्हाला डिवचले जात होते की, तुमचे खासदार मोदींच्या चेहर्यावर निवडून आले आहेत. मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. आज परत फोडाफोडी कशासाठी? काय मिळवायचे तुम्हाला? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी दोन-अडीच सीमा सुरक्षा दल घुसवले. स्वतःचा पक्ष जिंकवण्यासाठी देशाचे सुरक्षा दल तुम्ही वापरता? याबाबत कुणालाच काही वाटत नाही. दोन-अडीच लाख फौज तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरता? तर मग ती जळत असलेल्या मणिपूरमध्ये का घुसवत नाही? शेतकर्यांना कर्जमाफी देताना अटी लादल्या जातात, पण आमदार आणि खासदार विकत घ्यायला कोणतीही अट नाही. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलेला आहे. आजकाल चोरी पकडली की, चोर त्याला ‘ऑपरेशन’ म्हणतात. सत्ताधारी मंडळी सत्तेचा वापर करून अशी ‘ऑपरेशन’ करत असतील, तर आता देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळून भाजपावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल. आम्ही 30 वर्षे भाजपासोबत राहून आम्ही भाजपामध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार. उलट मला भीती वाटते की, ‘मिंधेसेना’च आता भाजपात विलीन होईल. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी शिवसेनेची सुरुवातीपासूनची वाटचाल स्वतः पाहिली आहे. मी आज सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक आहे. शिवसेनेचा पहिला नारळ फोडला, त्यावेळी मी उपस्थित होतो. मातोश्रीने वाढवायचे आणि त्यांनी फक्त स्वतःचे उखळ पांढरे करायचे, हे आता चालणार नाही. आज काही जणांना स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी दुसर्यांचे बाप चोरावे लागत आहेत. स्वाभिमान असलेल्या शिवसैनिकाच्या रक्तात अशी गद्दारीची भेसळ कशी काय येऊ शकते? आजही काही जण मातोश्रीच्या वैभवावर आणि लोकप्रियतेवर जळत आहेत. तुम्ही स्वतःला खरे सिद्ध केले आहे, तर मग आता परत फोडाफोडीचे राजकारण कशासाठी करत आहात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दार होते. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपल्या कार्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनाही असाच त्रास दिला गेला. पण जुन्या कुप्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रबोधनकार नेहमी खंबीरपणे उभे राहिले. आज माझ्यावर, आदित्य आणि तेजसवरही घाणरडे आरोप केले जात आहेत. पण आम्ही डगमगणार नाही. शेवटी शिवसैनिकांना भावनिक साद घालताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांनो, मी तुम्हाला विचारतो, मी 12 वर्षांपासून नेतृत्व करतो आहे. माझ्यावर जे आरोप झाले, ते खरे असतील तर मला सांगा, मी आता पक्षप्रमुखपदावरून पायउतार व्हायला तयार आहे. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो पक्षप्रमुख होईल. ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या आणि दरोडेखोराच्या हातात जाऊ देऊ नये, लाचार गद्दार आणि भेसळयुक्त माणूस माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचे आहे. मी पद सोडायला तयार आहे. मी डगमगलो नाही, मी खचलेलो नाही. अनेक संकटे आली, अनेक वादळे आली, मी पळणारा नाही. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी करेन. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल, त्या क्षणी पद सोडल्याशिवाय राहणार नाही.









