Rujuta Diwekar Diet Tips: आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. ऑफिसचे काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे आपले मन सतत व्यस्त असते.
थोडाफार ताण असणे सामान्य आहे, परंतु जेव्हा हा ताण दीर्घकाळ टिकतो, तेव्हा शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. यामागे ‘कॉर्टिसॉल’ नावाचे संप्रेरक (हार्मोन) कारणीभूत असते, ज्याला ‘स्ट्रेस हार्मोन’ देखील म्हटले जाते.
शरीरात कॉर्टिसॉलची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास झोप न येणे, पचनाच्या समस्या, त्वचेचे विकार, थकवा आणि हार्मोन्सचे असंतुलन यांसारखे त्रास सुरू होतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या मते, अनेक जण नकळत खाण्यापिण्याच्या अशा काही चुका करतात, ज्यामुळे हा ताण कमी होण्याऐवजी आणखी वाढतो. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून अशाच ३ सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या कॉर्टिसॉल आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
तणाव वाढवणाऱ्या खाण्यापिण्याच्या ३ मुख्य चुका
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या चुका आणि त्यावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- १. डाएटच्या नावाखाली कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करणे: वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी अनेक जण ‘लो-कार्ब’ डाएटचा चुकीचा अर्थ काढतात. लोक बिस्किट, चॉकलेट यांसारखे प्रक्रिया केलेले अन्न बंद करण्याऐवजी रोजच्या जेवणातील चपाती, भात, पोहे, उपमा, इडली आणि डोसा यांसारखे पारंपारिक पदार्थ खाणे बंद करतात. जेव्हा आपण संतुलित आहार घेणे थांबवतो, तेव्हा मेंदूतील ‘GABA’ नावाचे न्यूरोट्रांसमीटर कमी होते, जे मूळात ताणतणावावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
- २. सकाळी नाश्ता न करणे: आजकाल अनेक जण सकाळी वेळेअभावी किंवा डाएटचा भाग म्हणून नाश्ता करणे टाळतात आणि फक्त चहा किंवा कॉफी पिऊन कामाला सुरुवात करतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी शरीरात कॉर्टिसॉलची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. अशा वेळी नाश्ता न केल्यास हा ताण दिवसभर शरीरात तसाच राहतो. त्यामुळे सकाळी घरचा बनवलेला सकस नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे.
- ३. हंगामी फळे खाण्याची भीती बाळगणे: फळांमध्ये नैसर्गिक साखर (नॅचरल शुगर) असते, या भीतीने अनेक जण फळे खाणे सोडून देतात. ऋजुता यांनी आंबा आणि केळी यांसारखी हंगामी फळे खाण्याचा सल्ला दिला आहे. ही फळे शरीराला ‘प्रीबायोटिक्स’ पुरवतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी किंवा कॉर्टिसॉल नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही कडक डाएटची गरज नसते. त्यासाठी फक्त आहारात सातत्य आणि शरीराबद्दल आपुलकी असणे गरजेचे आहे, असा सल्ला ऋजुता दिवेकर यांनी शेवटी दिला आहे.










