Aadhaar Card Update Free: भारतात ओळखपत्र म्हणून अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आधार कार्डबाबत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षा आणि गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठी १ जुलै २०२६ पासून आधार कार्डशी संबंधित एक विशेष सेवा पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या नव्या सुविधामुळे नागरिकांना आता ही सेवा अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही.
अधिकृत अधिसूचनेनुसार, आधार मोबाईल अॅपचा वापर करून आपल्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची किंवा लिंक करण्याची प्रक्रिया आता मोफत होणार आहे.
ही विशेष सवलत १ जुलै २०२६ पासून सुरू होणार असून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत म्हणजेच पुढील ६ महिन्यांसाठी लागू राहील. यापूर्वी या सेवेसाठी नागरिकांना ७५ रुपये शुल्क द्यावे लागत होते, मात्र आता पुढील ६ महिने ही सुविधा मोफत असेल.
ईमेल आयडी लिंक असण्याचे फायदे आणि नवीन नियमांच्या अटी:
आधार कार्डसोबत आपला चालू ईमेल आयडी जोडणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या सुविधेबाबत खालील गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे:
- १. फसवणुकीपासून संरक्षण: जर तुमचा ईमेल आयडी आधारशी जोडलेला असेल, तर तुमच्या आधारचा कुठेही वापर झाल्यास किंवा कोणताही बदल केल्यास त्याची त्वरित माहिती तुम्हाला ईमेलवर मिळते. यामुळे आधारचा गैरवापर रोखता येतो.
- २. फक्त मोबाईल अॅपसाठी सवलत: लक्षात ठेवा की, फीमधील ही ७५ रुपयांची सूट केवळ आधारच्या अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे (Aadhaar Mobile App) ईमेल अपडेट करणाऱ्यांनाच मिळणार आहे.
- ३. इतर पर्यायांसाठी शुल्क लागू: जर तुम्ही ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा किंवा अधिकृत केंद्रांचा वापर केला, तर त्यासाठी युआयडीएआयच्या नियमांनुसार शुल्क लागू राहू शकते.
३१ डिसेंबरनंतर नियमांचा पुन्हा आढावा घेणार
युआयडीएआयने नागरिकांना सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने डिजिटल सेवा पुरवण्यासाठी हे विशेष मोबाईल अॅप्लिकेशन अद्ययावत केले आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ या ६ महिन्यांच्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांनी आपला ईमेल आयडी लिंक करावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
ही मुदत संपल्यानंतर, म्हणजेच ३१ डिसेंबर २०२६ नंतर या धोरणाचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानंतर ही मोफत सेवा पुढे चालू ठेवायची की पुन्हा शुल्क लागू करायचे, याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ७५ रुपयांची बचत करण्यासाठी आणि आपले आधार सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना या ६ महिन्यांच्या कालावधीत मोबाईल अॅपद्वारे आपले ईमेल अपडेट करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.










