Telegram Ban Lifted: देशभरातील लाखो टेलिग्राम (Telegram) युझर्ससाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET-UG) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम अॅपवर लावलेली तात्पुरती बंदी अखेर पूर्णपणे उठवली आहे.बंदीची मुदत संपल्यानंतर आता देशभरात टेलिग्रामची मेसेजिंग सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक युझर्सना मेसेज पाठवण्यामध्ये आणि प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत होत्या. मात्र, आता टेलिग्रामने सरकारी नियमांचे पालन करत सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्रामवर बंदी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले असून, सर्व युझर्सच्या मोबाईलमध्ये हे अॅप आता नेहमीप्रमाणे काम करू लागले आहे.
नीट’ पेपरफुटीच्या अफवा आणि ‘मेसेज एडिटिंग’ फिचरचा गैरवापर
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या संशयावरून ती परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यानंतर २१ जून रोजी झालेल्या पुनर्परीक्षेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून सरकारने टेलिग्रामवर थेट बंदी आणली. कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान या बंदीची खालील कारणे समोर आली आहेत:
चॅनेल्स ब्लॉक करण्यात अपयश: सरकारने असे आक्षेपार्ह चॅनेल्स ब्लॉक केले तरी त्यांचे हुबेहूब दुसरे चॅनेल्स पुन्हा तयार होत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने संपूर्ण अॅपवरच ६ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
१० लाखांना बनावट पेपरची विक्री: टेलिग्रामवर काही ग्रुप्स बनावट प्रश्नपत्रिका तब्बल 10 लाख रुपयांना विकत असल्याचा संशय होता.
मेसेज एडिटिंग फिचरचा गैरवापर: टेलिग्रामवरील मेसेज एडिट केल्यावर त्याची मूळ वेळ (टाईमस्टॅम्प) बदलत नाही. याचा गैरवापर करून काही चॅनेल्सनी परीक्षा संपल्यानंतर मेसेज बदलून ‘पेपर आधीच लीक झाला होता’ असा खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली हायकोर्टानेही दिला होता सरकारला पाठिंबा
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचे साहित्य शेअर करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या या अॅपवरील बंदीचे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयातही पोहोचले होते. मात्र, न्यायालयाने १९ जून रोजी दिलेल्या निर्णयात सरकारच्या या तात्पुरत्या बंदीचे समर्थन केले होते. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षेची गोपनीयता जपण्यासाठी सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने म्हटले होते.
सरकारी आदेशानुसार, जरी मेसेजिंग सेवा आता टप्प्याटप्प्याने सुरू होत असली, तरी टेलिग्रामला त्यांच्या अॅपमधील ‘मेसेज एडिटिंग’ हे फिचर मात्र ३० जूनपर्यंत पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहे. ही अट पाळल्यानंतरच अॅप पूर्णपणे पूर्ववत होणार आहे.
हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा










