Vidhan Parishad Election Result 2026 : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा अत्यंत धक्कादायक आणि राज्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा निकाल नुकताच समोर आला आहे. महायुतीची जिल्ह्यात मोठी ताकद आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधी संख्याबळ पाठीशी असतानाही, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी या निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना या निवडणुकीत पराभवाचा तीव्र धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, दराडे यांनी आपल्या पराभवाची सविस्तर कारणमीमांसा करत महायुतीतील काही अंतर्गत नेत्यांवरच ‘घात’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
महायुती धर्म न पाळल्यानेच घात; नरेंद्र दराडेंची खंत-
आपल्या पराभवावर तीव्र खंत व्यक्त करताना नरेंद्र दराडे म्हणाले की, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या काही प्रमुख नेत्यांनी युती धर्म पाळला नाही. अंतर्गत फितुरी आणि नियोजित रणनीतीचा अभाव यामुळेच माझा पराभव झाला. या धक्कादायक पराभवाला नेमके कोणते नेते जबाबदार आहेत, याबाबतचा सविस्तर तोंडी अहवाल आपण शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. एकनाथ शिंदे यांनी दराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्द दिला असून, भविष्यात शिवसेनेचे (शिंदे गट) काम अधिक जोमाने आणि ताकदीने करणार असल्याचा निर्धार दराडे यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत बोलताना दराडे यांनी स्पष्ट केले की, पक्ष विस्तारासाठी विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना सहयोगी सदस्य म्हणून पक्षात सामावून घेण्यात आले आहे. या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पूर्वकल्पना दिली होती आणि त्या संदर्भात विचारणाही केली होती, अशी माहिती दराडे यांनी दिली.
गोकुळ गीते आता शिवसेनेचे सहयोगी सदस्य; छुप्या पाठिंब्याची चर्चा-
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात असल्याने, राज्याचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचे आणि त्यांची उमेदवारी मागे घेण्याचे अनेक प्रयत्न केले होते. या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गीते यांनी तांत्रिकदृष्ट्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणाही केली होती. मात्र, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्यांना मिळालेल्या छुप्या पाठिंब्यामुळे मतदानाचा कौल पूर्णपणे गोकुळ गीते यांच्या बाजूने झुकला आणि त्यांनी विजयाला गवसणी घातली.
विजय निश्चित झाल्यानंतर गोकुळ गीते तातडीने विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची अधिकृत घोषणा केली. गीते यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे संख्याबळ तांत्रिकदृष्ट्या अबाधित राहिले असले, तरी या निवडणुकीने महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव मात्र चव्हाट्यावर आणला आहे.










