Home / महाराष्ट्र / Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Lohagad Fort Murder Case: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर झालेल्या व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळे...

By: Team Navakal
Lohagad Fort Murder Case: "माझा मुलगा खूप लांब उभा होता…"; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
Social + WhatsApp CTA

Lohagad Fort Murder Case: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर झालेल्या व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरी याचे वडील बाबूलाल चौधरी यांनी आपल्या मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

“केतन दरीत कोसळला तेव्हा माझा मुलगा घटनास्थळापासून खूप लांब उभा होता, त्याला या कटात खोट्या पद्धतीने अडकवले जात आहे,” असा खळबळजनक दावा बाबूलाल चौधरी यांनी केला आहे.

बाबूलाल चौधरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, १८ जून रोजी चेतन घरातून आईला सांगून बाहेर पडला होता की तो दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत एका बिझनेस मिटिंगसाठी जात आहे. लोहगड किल्ल्यावर नेमके काय घडले, याची कुटुंबाला कोणतीही कल्पना नव्हती. पोलिसात अटक झाल्यानंतरच त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

“सिया केतनच्या अगदी जवळ उभी होती” आणि पासपोर्ट फ्लश केल्याचा धक्कादायक कट

आरोपीच्या वडिलांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबाचा हवाला देत अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत, तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासातून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत:

  • वडिलांचा दावा : बाबूलाल यांच्या म्हणण्यानुसार, चेतनने पोलिसांसमोर सांगितले की त्याने केतनला ढकलले नाही. घटना घडली तेव्हा केतनच्या सर्वात जवळ त्याची होणारी पत्नी सिया गोयल उभी होती. बाबूलाल यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी कधीही सियाला पाहिले नव्हते, केवळ पोलीस गाडीत तिला पहिल्यांदा पाहिले.
  • बाली ट्रिपसाठी पासपोर्ट टॉयलेटमध्ये केला फ्लश: पोलीस तपासात उघड झाले की, केतन आणि सियाचे ६ जून रोजी बाली येथे प्री-वेडिंग शूट ठरले होते. मात्र, सियाने जाणीवपूर्वक केतनचा पासपोर्ट गायब केला आणि तो एका फूड मॉलच्या टॉयलेटमध्ये फ्लश करून नष्ट केला, जेणेकरून ही ट्रिप रद्द व्हावी.
  • किल्ल्यावर केली होती रेकी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने ३१ मे रोजी केतनसोबत लोहगडला भेट दिली होती आणि ४ जून रोजी ती पुन्हा तिथे गेली. हा संपूर्ण हत्येचा कट रचण्यासाठी तिने आधीच किल्ल्याची पाहणी केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. १४ जून रोजीही केतनला मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न झाला होता.

रात्री पोलिसांनी फसवून नेले; वडिलांची पोलिसांवर नाराजी

चेतनच्या वडिलांनी पोलिसांच्या अटकेच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, “जेव्हा पोलीस रात्री चेतनला घरातून घेऊन गेले, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की ही केवळ एका आर्थिक फसवणुकीची केस आहे आणि २ तासांत त्याला सोडून दिले जाईल. मी रात्री २ वाजता पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा त्यांनी मला सकाळी येण्यास सांगितले. सकाळी गेल्यावर समजले की माझ्या मुलावर थेट खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.”

आपला मुलगा अतिशय प्रामाणिक असून तो रोज दुकानात काम करायचा, त्यामुळे त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि १६ जूनच्या घटनाक्रमाच्या आधारे सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच केतनला दरीत ढकलल्याचा संशय कायम ठेवला असून तपास सुरू आहे.

Web Title:
संबंधित बातम्या