Deool Band 2 Box Office: मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात सध्या ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या सिनेमाने अवघ्या महिनाभरातच ९० कोटींचा टप्पा ओलांडला असून, आता तो १०० कोटींच्या ऐतिहासिक क्लबमध्ये सामील होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
हा चित्रपट यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असतानाच, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक अत्यंत भावनिक आणि मोठे वक्तव्य केले आहे. “माझ्या सिनेमाने रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू नये,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘प्लॅनेट मराठी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना प्रवीण तरडे यांनी यामागचे मुख्य कारण स्पष्ट केले. तसेच ‘देऊळ बंद २’ ची घोडदौड पाहून स्वतः अभिनेते आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी त्यांना फोन करून दिलेल्या खास प्रतिक्रियेचाही खुलासा केला, ज्याची सध्या सिनेसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे.
“माझा चित्रपट पुढे गेला तरी…”; प्रवीण तरडेंनी स्पष्ट केले कारण
प्रवीण तरडे यांनी रितेश देशमुख आणि त्यांच्यातील फोन कॉलचा रंजक किस्सा सांगताना दोन्ही चित्रपट आणि मराठी अस्मितेवर भाष्य केले. त्यांच्या संवादातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- छत्रपती शिवरायांबद्दल आदर: माझा सिनेमा कितीही मोठा झाला, तरी त्याने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू नये असे मला वाटते, कारण तो चित्रपट आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आहे, असे तरडे म्हणाले.
- रितेश अन् जेनेलिया यांचे कौतुक: रितेश आणि जेनेलिया हे खूप सुंदर कपल असून त्यांनी देशात मराठी माणसाचा झेंडा रोवला आहे. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा हाऊसफुल्ल सुरू असतानाच ‘देऊळ बंद २’ थिएटरमध्ये आला आणि त्याने अवघ्या ११ दिवसांतच ५० कोटींचा गल्ला जमवला.
- स्पर्धेतून मराठी सिनेमा मोठा व्हावा: चित्रपट पुढे जात असल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी स्वतःहून फोन करून प्रवीण तरडेंचे अभिनंदन केले. एका मराठी सिनेमाने दुसऱ्या मराठी सिनेमाला मागे टाकून पुढे जाणे ही आनंदाची गोष्ट आहे. आपण एकमेकांशी निरोगी स्पर्धा करून मराठी सिनेसृष्टी मोठी केली पाहिजे, अशी सुंदर भावना रितेश यांनी व्यक्त केल्याचे तरडे यांनी सांगितले.
ना पाठीवर चॅनेलचा हात, ना मोठी मार्केटिंग टीम; तरीही रचला इतिहास
आपल्या चित्रपटाच्या यशाचे वेगळेपण सांगताना प्रवीण तरडे यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले. ‘सैराट’ किंवा ‘राजा शिवाजी’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या मागे मोठे टीव्ही चॅनेल्स आणि तगडी मार्केटिंग टीम उभी होती. मात्र, ‘देऊळ बंद २’ च्या पाठीशी कोणतीही मोठी यंत्रणा किंवा चॅनेल नव्हते. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या अलोट प्रेमामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचू शकला आहे.
३२ दिवसांत ९३.५0 कोटींची बंपर कमाई; तिसऱ्या शतकाकडे वाटचाल
बॉक्स ऑफिसवरील अधिकृत आकडेवारीनुसार, ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने जगभरातून ८४.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये परदेशातील कलेक्शन आणि ग्रामीण भागातील तंबू शोमधून मिळालेले उत्पन्न गृहीत धरल्यास, अवघ्या ३२ दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई तब्बल ९३.५० कोटी रुपये झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, मित्रांनो, नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने तयार केलेल्या वाटेवरून रितेश देशमुख आपली ‘राजा शिवाजी’ डौलात घेऊन निघाला. आता त्यांच्या मागोमाग मी आपला ‘देऊळ बंद २’ घेऊन १०० कोटींच्या उंबरठ्यावर आलो आहे. हा प्रवास खूप कठीण होता, पण तुमच्या साथीमुळे हे शक्य झाले. मराठी सिनेमा आता मोठा होत असून, लवकरच आपण मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील तिसरे शतक साजरे करू.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा










