Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अत्यंत संवेदनशील खटल्यात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५ वर्षे) याला या प्रकरणात पूर्णपणे दोषी ठरवले आहे. नसरापूर बलात्कार आणि खून प्रकरणात (Nasrapur Rape and Murder Case) पोलीस प्रशासनाने विक्रमी वेळेत न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) सादर केले होते, ज्याची दखल घेत जलदगती न्यायालयाने या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने पूर्ण केली. अखेर आज न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे याच्यावर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व आरोप सिद्ध झाले असल्याचे जाहीर केले.
गुन्ह्यांचे गांभीर्य आणि कायदेशीर तरतुदी
हा खटला विविध कलमांखाली चालवण्यात आला, ज्यामध्ये पोक्सो (POCSO) कायदा आणि हत्येच्या कलमांचा प्रामुख्याने समावेश होता. न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर आरोपीवरील सर्व गुन्हे सिद्ध मानले आहेत. यामध्ये सिद्ध झालेल्या गुन्ह्यांपैकी दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या (मृत्यूदंड) शिक्षेची तरतूद आहे, तर एका कलमाखाली आजन्म जन्मठेप आणि एका गुन्ह्यासाठी १४ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
न्यायालयातील नाट्यमय घडामोडी: न्यायाधीशांचा थेट सवाल आणि आरोपीचा बनाव
आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला थेट प्रश्न विचारला, “तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तुझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?”
यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी नराधम भीमराव कांबळे याने न्यायालयात पुन्हा एकदा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. तिथे जाताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही गंभीर मार लागला. ती रडू लागल्यामुळे मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती सारखी ओरडत होती.”
आरोपीचा हा केविलवाणा आणि खोटा युक्तिवाद न्यायमूर्तींनी तत्काळ फेटाळून लावला. न्यायाधीश त्याला कडक शब्दांत सुनावत म्हणाले, “आता तू जे सांगत आहेस तो केवळ इतिहास झाला आहे, कारण वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे तुझ्यावरील सर्व गुन्हे न्यायालयात पूर्णपणे सिद्ध झाले आहेत. आता फक्त शिक्षेवर बोलायचे आहे, तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” न्यायाधीशांच्या या रोकठोक सवालानंतर आरोपी भीमराव कांबळे पूर्णपणे निरुत्तर झाला आणि त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसण्यास सांगितले.
“आरोपी दयेच्या लायकीचा नाही”; सरकारी वकिलांचा आक्रमक युक्तिवाद
यानंतर सरकारी वकिलांनी आरोपीला कठोर कायदेशीर धडा शिकवण्यासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करत आक्रमक युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, “आरोपी भीमराव कांबळे याच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप दिसून येत नाही. तो कोणत्याही दयेच्या किंवा सहानुभूतीच्या लायकीचा नाही. ज्या निष्पाप बालिकेने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच मुलीवर त्याने तब्बल ३९ मिनिटे अत्यंत घृणास्पद, अमानुष आणि अघोरी कृत्य केले.”
वैद्यकीय तपासणीच्या (Medical Report) अहवालाचा हवाला देत सरकारी वकिलांनी स्पष्ट केले की, भीमराव कांबळे याने त्या चिमुरडीवर विविध प्रकारे कौर्य दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. हे कृत्य ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत येत असल्यामुळे समाजस्वास्थ्यासाठी या नराधमाला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही विनंती सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली आहे.









