Home / महाराष्ट्र / Eknath Shinde : पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता; संजय दिना पाटलांशी झालेल्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचे प्रसारमाध्यमांना मोठे स्पष्टीकरण..

Eknath Shinde : पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता; संजय दिना पाटलांशी झालेल्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचे प्रसारमाध्यमांना मोठे स्पष्टीकरण..

Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फारकत घेत सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे....

By: Team Navakal
Eknath Shinde 
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फारकत घेत सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, या प्रवेशानंतर अवघ्या काही दिवसांतच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली जात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच, “जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी माझ्या अंगावर येण्याचा किंवा मला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर ते थेट रुग्णालयात अथवा स्मशानात पोहोचतील,” अशी थेट आणि गंभीर धमकी संजय दिना पाटील यांनी दिली होती. ही घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा खासदार पाटील यांनी वार्ताहरांशी संवाद साधताना अत्यंत अर्वाच्य आणि असभ्य भाषेचा वापर करत पत्रकारांना जाहीर शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणावर आता राज्याचे एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली असून, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

खासदार संजय दिना पाटील यांच्या या अशोभनीय वर्तनावर प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना घेरले असता, त्यांनी या प्रकरणाची बाजू सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना शिंदे म्हणाले, “मी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहे आणि त्यानंतरच तुमच्याशी अधिक तपशीलात बोलेन. परंतु, माझी नुकतीच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माझ्याकडे याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांबद्दल कोणतेही चुकीचे किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता, अशी भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यांचे पत्रकारांशी नेहमीच सलोख्याचे आणि चांगले संबंध राहिले असून, माध्यम प्रतिनिधींच्या भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता.”

या विषयावर पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचे नाव पुढे करत, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिंदे म्हणाले की, “गेल्या अनेक दिवसांपासून जे नेते रोज आमच्याविरोधात गरळ ओकत आहेत, अत्यंत अपशब्द वापरत आहेत, ‘तोडून टाका, मारून टाका, घरात घुसा’ यांसारखी विधाने करून नीच आणि खालच्या पातळीवरील भाषेचा प्रयोग करत आहेत, तो वास्तविक पाहता माध्यमांचाही अवमान आहे. कित्येक महिन्यांपासून कशा प्रकारची विखारी भाषा वापरली जात आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. या सातत्यपूर्ण चिखलफेकीमुळे संजय दिना पाटील यांच्या मनात तीव्र संताप होता. त्यांचा राग प्रामाणिक पत्रकारांवर नसून, रोज अशी खालची पातळी गाठणाऱ्या राजकीय नेत्यांवर आहे.” लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना संयम राखला पाहिजे, असे स्पष्ट करत शिंदेनी पुढे सांगितले की, “जर आपल्याकडून चुकून काही अपमानकारक शब्द गेले असतील, तर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी, अशी समज मी संजय पाटील यांना दिली आहे.”

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत शिंदे यांनी सन २०२२ मधील सत्तांतराचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “सन २०२२ पासून महाराष्ट्रात ज्या प्रकारची शिवराळ भाषा वापरली जात आहे, विरोधी नेत्यांच्या कुटुंबावर आणि महिलांवर ज्या पद्धतीने अत्यंत निंदनीय भाषेत चिखलफेक केली जात आहे, ती महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती नक्कीच नाही. ‘डोंट कट इट’ (माझे वक्तव्य कापू नका) असे सांगून आई-बहिणींचा उद्धार करण्यापर्यंत काहींची पातळी घसरली आहे. या नेत्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला रसातळाला नेले असून, याच अन्यायाचा आणि वैचारिक घसरणीचा राग खासदार संजय पाटील यांच्या मनात उद्दिग्नतेच्या रूपाने बाहेर आला.”

दुसरीकडे, या वादाच्या केंद्रस्थानी असलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधीला न शोभणाऱ्या अत्यंत अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर करत ते कॅमेऱ्यासमोर म्हणाले, “तुम्ही पत्रकार जर पुन्हा या परिसरात आलात, तर मी तुम्हाला थेट मारून पाठवेन. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, माझे हे वक्तव्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. तुम्ही विनाकारण माझ्या व्यक्तिगत विषयात आणि कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहात. मी हे सर्व उपस्थित पोलिसांच्या समोर जाहीरपणे सांगत आहे, तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती खुशाल करा.” लोकप्रतिनिधीच्या या दादागिरी आणि अरेरावीच्या भाषेमुळे पत्रकार वर्गासह राजकीय वर्तुळातून आता त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या