Indian Railways New Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ट्रेन तसेच रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे वस्तू विकणे (फेरी मारणे), भीक मागणे आणि धूम्रपान करणे यांसारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कायद्याचा बडगा उगारला आहे. जन विश्वास कायदा २०२६ च्या अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून १९ जून रोजी याचे अधिकृत गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नवीन नियमांनुसार आता केवळ आर्थिक दंडच नाही, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट तुरुंगवासाची हवा देखील खावी लागू शकते. रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी हे नवीन नियम समजून घेणे आवश्यक आहे.
ट्रेनमध्ये बिडी-सिगारेट ओढल्यास थेट तिकीट जप्त; ५,००० पर्यंत दंड
रेल्वे कायद्याच्या कलम १६७ नुसार ट्रेन आणि रेल्वे परिसरात धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. भूतकाळात रेल्वेत लागलेल्या अनेक आगी या धूम्रपान किंवा ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीमुळे लागल्याचा संशय रेल्वेने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खालील नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत:
- तात्काळ दंड आणि तिकीट जप्ती: रेल्वेत धूम्रपान करताना पकडले गेल्यास आता जागेवरच २००० रुपयांचा दंड आकारला जाईल. यासोबतच संबंधित प्रवाशाचे रेल्वे तिकीट किंवा पास जप्त केला जाईल आणि त्याला ट्रेनमधून खाली उतरवले जाईल.
- कोर्टाकडून कडक कारवाई: जर संबंधित व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिला, तर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल. दोषसिद्धीनंतर कोर्टाकडून कमाल ५००० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, पुरेशा कारणांशिवाय हा दंड २००० रुपयांपेक्षा कमी केला जाणार नाही.
विनापरवाना फेरी मारणे आणि भीक मागणाऱ्यांवर कडक निर्बंध; थेट ३ महिन्यांची जेल
ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सामानाची विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांमुळे आणि भीक मागणाऱ्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी रेल्वे कायद्याच्या कलम १४४ मध्ये खालील मोठे बदल करण्यात आले आहेत:
स्थानकावरून हाकलून देणार: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीला अधिकृत रेल्वे कर्मचारी किंवा सुरक्षा दलाच्या मदतीने चालत्या ट्रेनमधून, प्लॅटफॉर्मवरून किंवा रेल्वे स्थानक परिसरातून तात्काळ बाहेर काढले जाईल.
पहिल्या गुन्ह्यासाठी शिक्षा: रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत परवान्याशिवाय ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर कोणत्याही वस्तूची विक्री केल्यास किंवा भीक मागितल्यास सुरुवातीला २००० रुपयांचा दंड होईल. दंड न भरल्यास ३ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, २००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार ही शिक्षा किमान १ महिना जेल किंवा २००० रुपये दंडापेक्षा कमी असणार नाही.
चौथ्यांदा पकडले गेल्यास थेट १ वर्षाची जेल: जर एखादा विक्रेता किंवा व्यक्ती चौथ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा याच गुन्ह्यात दोषी आढळली, तर त्याला थेट १ वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि २००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल. यामध्ये किमान ३ महिन्यांची जेल आणि २००० रुपयांचा दंड अनिवार्य करण्यात आला आहे.









