Home / महाराष्ट्र / Mumbai Police Action: पोलिसांची मोठी कामगिरी! मोहरमच्या मिरवणुकीवर विषाणूजन्य हल्ल्याचा कट उधळला; तब्बल 14,900 विषारी कॅप्स्युल्ससह व्यापारी अटकेत

Mumbai Police Action: पोलिसांची मोठी कामगिरी! मोहरमच्या मिरवणुकीवर विषाणूजन्य हल्ल्याचा कट उधळला; तब्बल 14,900 विषारी कॅप्स्युल्ससह व्यापारी अटकेत

Mumbai Police Action: मुंबई पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा एक भयंकर आणि तितकाच धक्कादायक कट उधळून लावला...

By: Team Navakal
Mumbai Police Action: पोलिसांची मोठी कामगिरी! मोहरमच्या मिरवणुकीवर विषाणूजन्य हल्ल्याचा कट उधळला; तब्बल 14,900 विषारी कॅप्स्युल्ससह व्यापारी अटकेत
Social + WhatsApp CTA

Mumbai Police Action: मुंबई पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा एक भयंकर आणि तितकाच धक्कादायक कट उधळून लावला आहे. एका संशयित व्यक्तीकडून तब्बल 14900 विषारी कॅप्स्युल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

या कॅप्स्युल्स मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या नागरिकांमध्ये वाटून मोठी जीवितहानी घडवून आणण्याचा आरोपीचा डाव होता. मात्र, या कॅप्स्युल्स लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव फैयाज प्रेमजी असून, तो मूळचा पुण्याच्या विमान नगर भागातील रहिवासी आहे. पुण्यात त्याचा रंगाचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून तो मुंबईतील डोंगरी भागातील एका गेस्ट हाऊस आणि डॉर्मिटरीमध्ये मुक्कामास होता. जे. जे. आणि भायखळा परिसरातून जाणाऱ्या मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला त्याने लक्ष्य करण्याचे नियोजन केले होते.

उंदीर मारण्याचे ५० किलो विष वापरून बनवल्या होत्या कॅप्स्युल्स

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या संपूर्ण कटाचा अतिशय थरारक खुलासा झाला आहे:

  • ५० किलो विष खरेदी: आरोपीने बाजारातून तब्बल 50 किलो ‘झिंक फॉस्फाईड’ नावाचे उंदीर मारण्याचे घातक विष खरेदी केले होते.
  • कॅप्स्युल्सची निर्मिती: हे विष स्वतःच्या जागेवर बसून औषधांच्या रिकाम्या कॅप्स्युल्समध्ये भरण्याचे काम तो गेल्या काही दिवसांपासून करत होता. जप्त केलेल्या प्रत्येक कॅप्स्युल्समध्ये सुमारे 1 ग्रॅम इतके घातक विष भरण्यात आले होते.
  • अशी झाली अटक: मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना तो या कॅप्स्युल्स वाटत असतानाच पोलिसांना त्याचा संशय आला. पहाटे 4 च्या सुमारास मिरवणुकीतील एका व्यक्तीला अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुरक्षा दलांनी तात्काळ हालचाल करत फैयाजला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, मिरवणुकीला लक्ष्य करण्याच्या हेतूनेच आपण हे कृत्य करत असल्याची कबुली त्याने दिली.

३० हजार कॅप्स्युल्स वाटण्याची होती योजना; खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा एकूण 30000 विषारी कॅप्स्युल्स तयार करून त्या लोकांमध्ये वाटण्याचा कट होता. मात्र, तो अर्ध्या मोहिमेत असतानाच पोलिसांनी त्याला 14900 कॅप्स्युल्ससह रंगेहात पकडले. पोलिसांनी वेळेत केलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 109, 110 आणि 123 अंतर्गत विष प्रयोग करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; १ वर्षात १९ वेळा इराण-इराक दौरा

तपास यंत्रणांना या प्रकरणात काही आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याचा दाट संशय आहे. फैयाज प्रेमजी याने 2019 ते 2025 या कालावधीत इराण आणि इराक या देशांचे अनेक दौरे केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या १ वर्षाच्या कालावधीत त्याने तब्बल 19 वेळा इराण आणि इराकचा प्रवास केला आहे. या दौऱ्यांमागील नेमका उद्देश काय होता आणि तो तिथल्या कोणाच्या संपर्कात होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपी स्वतः शिया खोजा मुस्लिम समाजातील असून त्याचे कुटुंब सध्या परदेशात आहे. त्याची बहीण इराणमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते आणि त्याची आई देखील सध्या इराणमध्येच वास्तव्यास आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता त्याचा घटस्फोट झाला असून तो पत्नीपासून वेगळा राहतो.

सध्या पोलीस आरोपीचा मोबाईल फोन, डिजिटल रेकॉर्ड, बँक खात्यांचे व्यवहार आणि कॉल डिटेल्सची कसून चौकशी करत आहेत. त्याने हे कृत्य एकट्याने केले आहे की तो एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग आहे, तसेच त्याला कोणाचे मार्गदर्शन किंवा चिथावणी मिळाली होती का, या सर्व बाजूंनी मुंबई पोलीस तपास करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या