IND vs IRE T20: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 34 धावांनी धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताचा आयर्लंडविरुद्धचा हा पहिलाच पराभव ठरला. या पराभवामुळे आता ३ सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया 0-1 ने मागे पडली असून मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजचा सामना गमावल्यास भारताला मालिका गमवावी लागेल, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.
पहिल्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माचा अपवाद वगळता भारताच्या टॉप-4 मधील इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आजच्या सामन्यात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सामन्याचे ठिकाण आणि वेळ
- कधी आणि कुठे होणार सामना: भारत आणि आयर्लंडमधील हा दुसरा टी20 सामना रविवार, 28 जून 2026 रोजी बेलफास्ट येथे खेळवला जाईल.
- टॉस आणि सामन्याची वेळ: भारतीय समयानुसार हा सामना संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा टॉस अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 5:30 वाजता टाकला जाईल.
लाईव्ह मॅच कुठे आणि फ्री मध्ये कशी पाहायची?
क्रिकेट चाहत्यांना या रोमांचक सामन्याचा आनंद वेगवेगळ्या माध्यमांवर घेता येईल:
- टीव्हीवर थेट प्रक्षेपण: या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर केले जाणार आहे, जिथे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल.
- मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह स्ट्रीमिंग: डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहण्यासाठी ‘सोनी लिव्ह’ अॅप आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- फ्री मध्ये सामना कसा पाहावा: टीव्हीवर हा सामना पूर्णपणे मोफत पाहायचा असेल, तर ‘डीडी स्पोर्ट्स’ वाहिनीवर तो उपलब्ध असेल. मात्र, मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना मोफत पाहण्याचा कोणताही अधिकृत पर्याय नाही. ज्या ग्राहकांकडे एअरटेल एक्सट्रीमचे सबस्क्रिप्शन आहे, ते देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
दोन्ही देशांचे अधिकृत स्क्वॉड्स:
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, टिळक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा.
आयर्लंड संघ: लॉर्कन टकर (कर्णधार/विकेटकीपर), रॉस अडायर, बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहनी, मॅथ्यू हम्फ्रीज, गॅविन होई, मॅथ्यू हॉलंड, लिआम मॅकार्थी, जय मुंद्रा, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, रुबेन विल्सन.










