WhatsApp Username Issue: व्हॉट्सअॅप युझर्सना मोबाईल नंबर शेअर न करता केवळ ‘युझरनेम’द्वारे चॅटिंग करण्याची सुविधा देणारे एक मोठे फिचर आणत आहे. या सुविधेमुळे युझर्सची प्रायव्हसी अधिक मजबूत होईल असा दावा कंपनी करत असली, तरी या नव्या फिचरने आता भारत सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. रिपोर्टनुसार, केंद्र सरकार व्हॉट्सअॅपच्या या नवीन सिस्टीमची अतिशय बारकाईने तपासणी करण्याची योजना आखत आहे.
विशेषतः डिजिटल फ्रॉड (ऑनलाईन घोटाळे) आणि युझर्सची सुरक्षा या दृष्टिकोनातून या फिचरचे पुनरावलोकन केले जाईल. या तपासणी दरम्यान जर सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास, सरकार व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी ‘मेटा’ला अधिकृत नोटीस बजावून स्पष्टीकरण मागू शकते.
ऑनलाईन स्कॅम वाढल्याने सरकार अॅक्शन मोडमध्ये
भारतात गेल्या काही काळापासून डिजिटल आणि ऑनलाईन स्कॅम्सच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा सर्रास वापर करत आहेत.
- नवे आव्हान: सरकारी अधिकारी आता या गोष्टीचा अभ्यास करणार आहेत की, नंबरऐवजी युझरनेम सिस्टीम आल्यामुळे स्कॅमर्सचा शोध घेणे कठीण होईल का?
- सुरक्षेशी तडजोड नाही: युझरनेममुळे प्रायव्हसी नक्कीच वाढेल, परंतु त्यामुळे देशाच्या सुरक्षेशी आणि सायबर गुन्हेगारांचा माग काढण्याच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होऊ नये, यावर सरकारचा भर आहे.
हे फिचर पूर्णपणे लाँच होण्यापूर्वी किंवा लाँच होत असतानाच केंद्र सरकार यातील सुरक्षा उपायांची पडताळणी करेल. सायबर गुन्हेगारांकडून याचा गैरवापर रोखण्यासाठी अॅपमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा आहे का, यावरच मुख्य भर असेल.
कसे काम करणार हे नवीन फिचर?
व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे की, हे फिचर पूर्णपणे ऐच्छिक असेल, म्हणजेच युझरनेम तयार करणे बंधनकारक नसेल.
- नंबर लपवता येणार: ग्रुप चॅट्समध्ये किंवा पहिल्यांदा कोणाशी तरी बोलताना ज्यांना स्वतःचा मोबाईल नंबर शेअर करायचा नसतो, त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरेल. व्हॉट्सअॅपच्या प्रॉडक्ट हेड अॅलिस न्यूटन-रेक्स यांनी सांगितले की, युझर्सनी प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख कशी दाखवावी, याचे पूर्ण नियंत्रण त्यांना देणे हा यामागचा उद्देश आहे.
- ३५ अक्षरांची मर्यादा: युझर्स कमाल 35 अक्षरांचे युझरनेम तयार करू शकतील. प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांची नावे आधीच ब्लॉक (सुरक्षित) ठेवली जातील.
- मोबाईलवरूनच बुकिंग: युझरनेम रिझर्व्हेशनची ही प्रक्रिया केवळ मोबाईल अॅपवरूनच करता येईल. सुरुवातीच्या टप्प्यात व्हॉट्सअॅप वेब किंवा डेस्कटॉप अॅपवर हा पर्याय मिळणार नाही.
- क्रिएटर्ससाठी सोय: बिझनेस आणि क्रिएटर्सना त्यांचे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरील युझरनेम व्हॉट्सअॅपवरही वापरता येईल, ज्यासाठी त्यांना मेटा अकाऊंट सेंटरच्या मदतीने आपले अकाऊंट्स लिंक करावे लागतील.
तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; व्हॉट्सअॅपकडे सुरक्षेचे अनेक स्तर
हे फिचर प्रायव्हसी वाढवणारे असले, तरी काही सायबर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, स्कॅमर्स एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाचे खोटे युझरनेम तयार करून लोकांची फसवणूक करू शकतात.
यावर उत्तर देताना व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे अशा गैरप्रकारांचा शोध घेण्यासाठी सुरक्षेचे अनेक स्तर कार्यरत आहेत. याचाच एक भाग म्हणून कंपनी ऐच्छिक ‘युझरनेम की’ चा पर्याय देणार आहे. हे युझरनेमसोबत शेअर करावे लागेल, ज्यामुळे कोणीही तुमच्या नावाचा गैरवापर करू शकणार नाही. याशिवाय, सर्व प्रायव्हेट मेसेज नेहमीप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतील आणि जाहिरातींसाठी वापरले जाणार नाहीत, मात्र लोकेशन आणि बेसिक प्रोफाईल डेटा यांसारखा मेटाडेटा गोळा केला जाईल.










