Mumbai News : राज्यभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांची मालिका थांबताना दिसत नाहीये. दोनच दिवसांपूर्वी चेंबूर येथे एका शाळेच्या बसवर झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता मुंबईत आणखी एक थरारक आणि चिंताजनक दुर्घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर एका उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मोबाईलवर बोलत असताना घडली दुर्घटना; छत्री आणि चप्पल सापडली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ हा अपघात घडला. या मॅनहोलच्या देखभालीचे काम एका खासगी कंत्राटदाराकडून सुरू होते, ज्याच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिमेदरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल मॅनहोलजवळ जप्त करण्यात आली आहे. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग अत्यंत तीव्र असल्याने ही व्यक्ती भुयारी गटारात वाहून गेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू-
सध्या मुंबई अग्निशामक दल (MFB), स्थानिक पोलीस प्रशासन, प्रभाग कार्यालयाचे कर्मचारी आणि ‘१०८’ रुग्णवाहिका दल घटनास्थळी तैनात असून संयुक्तपणे शोधमोहीम राबवत आहेत. पाण्याचा प्रवाह आणि भुयारी मार्गाचे जाळे लक्षात घेऊन विविध ठिकाणी तपास केला जात आहे.
महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुंबईत पावसाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच गेल्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) एक अधिकारीच स्वतः मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.










