Home / मनोरंजन / Khashaba Movie : कोण होते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव? नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Khashaba Movie : कोण होते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव? नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Khashaba Movie : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सिनेसृष्टीत ज्या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती, त्या ‘खाशाबा’ सिनेमाचा धमाकेदार टीझर अखेर...

By: Team Navakal
Khashaba Movie : कोण होते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव? नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज
Social + WhatsApp CTA

Khashaba Movie : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सिनेसृष्टीत ज्या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती, त्या ‘खाशाबा’ सिनेमाचा धमाकेदार टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ यांसारख्या चित्रपटांतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एका महान भारतीय सुपुत्राची यशोगाथा रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत.

थिएटरमध्ये आधीच प्रदर्शित झालेल्या या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता, आणि आता तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे रिलीज करण्यात आला आहे. २ मिनिटे ८ सेकंदांच्या या टीझरमध्ये लाल मातीतील अस्सल कुस्ती, भव्य सेट्स आणि अचूक लोकेशन्स पाहायला मिळत असून, यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुख्य भूमिकेत ‘नवा चेहरा’; तगडी स्टारकास्ट मैदानात

चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला, तरी दिग्दर्शकाने एक मोठे गुपित अजूनही कायम ठेवले आहे. चित्रपटात मुख्य नायक म्हणजेच खाशाबांची भूमिका कोण साकारत आहे, हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

  • महाराष्ट्रभर ऑडिशन्स: खाशाबा जाधवांच्या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांना एक फ्रेश चेहरा हवा होता. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ऑडिशन्स घेऊन एका नवीन अभिनेत्याची निवड केली असून, त्याचे नाव लवकरच घोषित केले जाईल.
  • दमदार सहकलाकार: मुख्य अभिनेता नवा असला, तरी त्याला साथ देण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज सज्ज आहे. यामध्ये जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
  • अजय-अतुलचे संगीत: जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला संगीतसम्राट अजय-अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

कोण होते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव?

हा चित्रपट स्वतंत्र भारताला वैयक्तिक गटात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. त्यांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी अशा:

  • कुस्तीचे बाळकडू: खाशाबा यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे झाला. त्यांचे वडील दादासाहेब हे स्वतः नामांकित पैलवान होते. घरातच कुस्तीचे वातावरण असल्याने खाशाबांना बालपणापासूनच कुस्तीचे धडे मिळाले.
  • स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग: कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला होता. तिथे त्यांना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजींचे मार्गदर्शन मिळाले.
  • लोकांनी गोळा केली वर्गणी: १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी ५७ किलो वजन गटात त्यांची निवड झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांना ऑलिम्पिकला पाठवले.
  • इतिहास घडवला: हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या मल्लांना धूळ चारत खाशाबांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले आणि भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. १४ ऑगस्ट १९८४ रोजी या महान मल्लाचे निधन झाले.

सिनेमा कधी रिलीज होणार?

क्रीडा क्षेत्रातील हा सुवर्ण इतिहास सांगणारा ‘खाशाबा’ हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Sakinaka Manhole

Sakinaka Manhole : मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना: शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप-अजून किती निष्पाप बळी घेणार? संजय घाडींचा अश्विनी भिडेंवर थेट रोख..