Mumbai Monsoon : मुंबईत पावसाळ्याची (Mumbai Monsoon) जोरदार सुरुवात झाल्यानंतर झाडे आणि मोठ्या फांद्या कोसळण्याच्या (Tree collapses) घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. शहरभर सुरू असलेल्या या पडझडीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कुंदावाला यांचा मृत्यू झाला आहे. हे झाड बाजूला काढण्यात आले. धोकादायक झाडांची छाटणी (Tree Pruning) आणि सर्वेक्षणाच्या दाव्यांनंतरही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर असल्याचे समोर येत आहे.

कुर्ला (पश्चिम) येथील कमानी भागातील बीएमसी शाळेजवळ असलेल्या गोम्स गाऊन बिल्डिंग परिसरात ही घटना घडली. आज दुपारी एक मोठं झाड एका दुकानावर कोसळलम. दुर्घटनेत दुकानात उपस्थित असलेले ६३ वर्षीय वृद्ध गंभीररित्या जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या ‘फौझिया हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, अवघ्या एका दिवसात शहरात तब्बल ६४ ठिकाणी झाडे किंवा मोठ्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक भागांत वाहनांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादर परिसर सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक ठरला. येथे सात ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे स्मारकाजवळ भलेमोठे झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे नुकसान झाले. शिवसेना भवन परिसरातही झाड कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा (Traffic Disruption) झाला आणि वाहनांच्या रांगा लागल्या.

दादर रेल्वे स्थानकाजवळील स्वामीनारायण मंदिर परिसरात घडलेली घटना अधिक धक्कादायक होती. अचानक झाड कोसळल्याने एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पवई येथील आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) मुख्य प्रवेशद्वारासमोर एका घरावर झाड कोसळल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. वडाळ्यात झाड पडून चार वाहनांचे नुकसान झाले, तर वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एका ऑटो-रिक्षावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

वांद्रे येथील पाली हिल (Pali Hill) परिसरात अभिनेता आमिर खान यांच्या निवासस्थानाबाहेरही झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरातील उच्चभ्रू परिसरही या संकटापासून सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले.
घाटकोपरच्या विक्रांत सर्कल परिसरात मध्यरात्री झाड कोसळल्याने स्थानिक नागरिकांची झोप उडाली. तर नेरुळमधील शिवाजी महाराज चौकाजवळ रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प (Traffic Standstill) झाली. झाड हटविण्यासाठी आपत्कालीन पथकांना (Emergency Team) घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

याशिवाय विलेपार्ले, माहीम, चेंबूर, वाशी, नेरुळ आणि पाली हिल परिसरातही झाडे व फांद्या कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या. अग्निशमन दल (Fire Brigade), महानगरपालिका कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रस्ते मोकळे करण्याचे काम केले.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि छाटणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील जुनाट आणि धोकादायक झाडांची नियमित तपासणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने (Monitoring System) निरीक्षण आणि वेळेवर छाटणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली असून पुढील काही दिवस झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
एकनाथ शिंदे आजारी ! ठाण्यातील रुग्णालयात उपचार
झाडे कोसळली! रस्ते खचले! पाणी तुंबले! जनजीवन विस्कळीत ! मुंबईसह राज्यात पावसाचा हाहाकार










