Rain : जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने राज्यात हाहाकार केला. मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, भिवंडीसह अनेक भागांत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, रस्ते खचणे, सखल भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले, नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासह काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
सलग चौथ्या दिवशी पडणार्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला, अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, वांद्रे, भांडूप, माटुंगा, विलेपार्ले आणि जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही तासांच्या पावसातच अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. लोकल सेवा उशिराने धावू लागली, तर रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये मध्यरात्री भलेमोठे वडाचे झाड कोसळून अनेक दुकानांचे नुकसान झाले. सुदैवाने मध्यरात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. माटुंगामध्ये झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान झाले. चेंबुरमध्ये सी.जी गिरवाई रोडवर पुन्हा झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी नाही. पवईच्या हिरानंदानी परिसरातही मोठे झाड कोसळले. ठाण्यातील खारेगाव परिसरात झाड कोसळून दोन दुचाकीस्वार जखमी झाले. नौपाडा भागात झाड कोसळले. नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरात हॉटेलवर झाड कोसळल्याने मालकाचे आर्थिक नुकसान झाले. सातार्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरासमोरहीझाड कोसळले.

मुंबईत भांडूपच्या एलबीएस रोडलगत बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळील रस्ता अचानक खचला. त्यासोबतच निर्माणाधीन सुरक्षा भिंत कोसळली आणि शेजारी उभा असलेला टेम्पो थेट खड्ड्यात पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे, भांडूपच्या व्हिलेज रोड परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकले. स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढत मदतकार्य केले. मुंबईत अंधेरी आणि मालाड सबवेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद केला. जोगेश्वरीतील एसआरपी कॅम्प परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या दरम्यान जोगेश्वरी पोलिसांनी लहान शालेय विद्यार्थ्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पाणी साचल्यामुळे चेंबूरमधील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरीतील वीरा देसाई रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी सबवे, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ परिसरातील रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद केले होते. कुर्ला रेल्वे स्थानक आणि विक्रोळी पोलीस ठाणे परिसर जलमय झाला. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये पाणी शिरले. ठाणे, दिवा, कळवा आणि घोडबंदर परिसरातील सखल भाग जलमय झाले. कल्याणमध्ये काळू नदी प्रवाहीत झाली, आडवली विसवलीमध्ये पाणीच पाणी झाले, बदलापूर – अंबरनाथ मार्गावर पाणी साचले, मुंब्रा येथे संरक्षक भिंत कोसळली.

ठाण्यात वंदना सिनेमागृह, गोखले रोड आणि राम मारुती रोड परिसरात पाणी साचले. याचा विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी साचलेल्या पाण्यात टायर ट्यूबवर बसून आंदोलन केले. नालेसफाईसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशेब द्यावा आणि कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 12 बंगला परिसरातही पाणी साचले होते. भिवंडीतील भाजी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने लहान विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले. तसेच कामवारी नदीचे पाणी वाढल्याने मंदिरांचे घाट पाण्यात गेले, तीनबत्ती भागात कमरेपर्यंत पाणी साचले तर लगतच्या पाड्यात पाणी शिरण्याचा धोका असल्याने अग्निशमन दल सतर्क झाले.
सिंधुदुर्गच्या देवगड निपाणी या कोकणात जाणार्या एकमेव राज्य मार्गाची फोंडाघाट परिसरात कमी पावसातही चाळण झाली.
नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने शहरातील नालेसफाई झालेली नसल्याचे उघड झाले. याशिवाय इगतपुरी येथे रेल्वे रुळावरही पाणी साचले होते.कोल्हापुरात आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याची नोंद झाली.तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट दरड कोसळण्याची शक्यता असल्याने 6 जुलैपर्यंत घाट रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान महाबळेश्वर येथे नावली गावाजवळही रस्ता खचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यवतमाळमध्ये यसिंधी गावाजवळील नाल्यावरील पुलावर टाकलेले डांबर अतिवृष्टीमुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. धुळ्यात अरुणावती नदीला पूर तर जळगावमध्ये तापी नदीलाही पूर आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिकच्या काही भागांत 6 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा आहे. नागरिकांना दर तीन तासांनी एसएमएसद्वारे अलर्ट दिले जात आहेत. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि प्रशासनाकडून देण्यात येणार्या सर्व अलर्टचे पालन करा. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
70 मिमीहून अधिक पावसाची
नोंद! रेड अलर्ट कायम
संततधार पावसामुळे गेल्या काही तासांत 70 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत दुपारपर्यंत विक्रोळी – 164.0 मिमी, राम मंदिर – 148.5 मिमी, सांताक्रूझ -126.9 मिमी, विद्याविहार – 102.0 मिमी, वांद्रे -72.5 मिमी, सायन – 63.5 मिमी, कुलाबा -53.4 मिमी, भायखळा -34.5 मिमी पावसाची नोंद झाली.
4 दिवसांपूर्वी मृत्यू तरीही गटारे
उघडी! महापौरांचा पारा चढला
मुंबईत साकीनाका भागात उघड्या गटारामुळे एका व्यक्तीचा चार दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतलेली नसल्याचे चित्र आहे. महापौर रितू तावडे यांच्या कॉटनग्रीन परिसरातील पाहणी दौर्यादरम्यान एका ठिकाणी झाकण नसलेले उघडे गटार आढळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.










